मुंबई इंडियन्सचा 42 धावांनी दणदणीत विजय
नॅट सिव्हर ब्रंट सामनावीर, युपी वॉरियर्स पराभूत, दीप्ती शर्माचे अर्धशतक वाया, सायका इशाकचे 3 बळी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेतील गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिव्हरची अष्टपमुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्सचा 42 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 31 चेंडूत 45 धावा तसेच 14 धावांत 2 गडी बाद करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघातील नॅट स्किव्हेर ब्रंटला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 बाद 160 धावा जमविल्या. त्यानंतर युपी वॉरियर्सने 20 षटकात 9 बाद 118 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. या स्पर्धेतील हा 14 वा सामना होता. मुंबई इंडियन्सच्या डावामध्ये नॅट सिव्हर ब्रंटने 31 चेंडूत 8 चौकारांसह 45, कर्णधार हरमनप्रित कौरने 30 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 33, अमेलिया केरने 23 चेंडूत 6 चौकारांसह 39, सजीवन सजनाने 14 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 22 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. सलामीची हिली मॅथ्यूज दुसऱ्या षटकात 4 धावांवर झेलबाद झाली. त्यानंतर यास्तीका भाटीया 2 चौकारांसह 9 धावा जमवित तंबूत परतली.
नॅट सिव्हर ब्रंट आणि हरमनप्रित कौर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 59 धावांची भागिदारी केली. ब्रंट बाद झाल्यानंतर हरमनप्रितला अमेलियाकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 28 धावांची भर घातली. अमेलिया केर आणि सजना यांनी सहाव्या गड्यासाठी 43 धावांची भागिदारी केल्याने मुंबई इंडियन्सला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. मुंबई इंडियन्सच्या डावात 1 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 37 धावा जमविताना 2 गडी गमविले. मुंबई इंडियन्सचे अर्धशतक 50 चेंडूत, शतक 83 चेंडूत तर दीडशतक 115 चेंडूत नोंदविले गेले. युपी वॉरियर्सतर्फे चमिरा अटापटूने 2 तर राजेश्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा आणि सायमा ठाकुर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मुंबई इंडियन्सच्या शिस्तबद्ध व भेदक गोलंदाजीसमोर युपी वॉरियर्सचे पहिले 5 फलंदाज केवळ 58 धावात तंबूत परतले कर्णधार हिलीने 3, किरण नवगिरेने 7, अटापटूने 3, हॅरिसने 2 षटकारांसह 15 तसेच सेहरावतने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. युपी वॉरियर्स संघातील दीप्ती शर्माने एकाकी लढत देत 36 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 53 धावा झळकाविल्या. युपी वॉरियर्सच्या केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली.
संक्षिप्त धावफलक - मुंबई इंडियन्स 20 षटकात 6 बाद 160 (नॅट सिव्हर ब्रंट 45, हरमनप्रित कौर 33, अमेलिया केर 39, सजना नाबाद 22, मॅथ्यूज 4 भाटीया 9, अमनजोत कौर 7, अवांतर 1, अटापटू 2-27, गायकवाड, दीप्ती शर्मा, सायमा ठाकुर प्रत्येकी 1 बळी), युपी वॉरियर्स 20 षटकात 9 बाद 118 (दीप्ती शर्मा नाबाद 53, सेहरावत 17, हॅरिस 15, उमा छेत्री 8, नवगिरे 7, इशाक 3-27, नॅट सिव्हर ब्रंट 2-14, इस्माईल 1-6, मॅथ्यूज 1-22, वस्त्रकार 1-8, सजना 1-12).