पंजाब किंग्सचे पराभवाचे ‘पंचक’
मुंबई इंडियन्सचा 6 गड्यांनी दणकेबाज विजय : सामनावीर तिलक वर्माची नाबाद 75 धावांची खेळी, शार्दुल ठाकुरचे 4, दीपक चहरचे 2 बळी
वृत्तसंस्था/धरमशाला
मुंबई इंडियन्सने गुरुवारी तिलक वर्मा आणि शार्दुल ठाकुरच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्सवर 6 गड्यांनी शानदार विजय मिळवला. पंजाबचा हा सलग पाचवा पराभव ठरला आणि ते 12 सामन्यांत 13 गुणांसह चौथ्या स्थानावरच राहिले. यामुळे चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स हे प्रत्येकी 12 गुण असलेल्या संघांना आता प्ले ऑफमध्ये शिरण्याची आयती संधी मिळाली आहे. या दोन्ही संघांचे प्रत्येकी 3 सामने शिल्लक आहेत. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 8 बाद 200 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने हा सामना 19.5 षटकांत जिंकण्याची किमया केली. 33 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी साकारणाऱ्या तिलक वर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
पंजाबने विजयासाठी दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने सावध फलंदाजी केली, तर एका टोकाकडून रायन रिकेल्टनने आक्रमक फटके खेळले. रिकेल्टन 23 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह 48 धावा करत बाद झाला. तर रोहित दोन षटकारांसह 25 धावा करत माघारी परतला. यानंतर नमन धीरला केवळ 9 धावा करता आल्या. रूदरफोर्ड व तिलक वर्मा यांनी 42 चेंडूत 61 धावांची भागीदारी रचली. पण, रुदरफोर्ड 20 धावा करत माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्मा व विल जॅक्स यांनी 20 चेंडूत 56 धावांची भागीदारी रचली. तिलकने 33 चेंडूत 6 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावांची मॅचविनिंग खेळी केली. तर विल जॅक्सने 10 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. या दोघांच्या अखेरच्या षटकांतील खेळीमुळे मुंबईने सामना 6 गड्यांनी जिंकला.
पंजाबची पराभवाची मालिका कायम
प्रारंभी, मुंबईने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केलें प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. प्रभसिमरन सिंगने 32 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 57 धावांची खेळी केली. तर प्रियांश आर्यने 22 धावा तर कुपर कॉनोलीने 21 धावांचे योगदान दिले. स्टार फलंदाज श्रेयस अय्यर 4, सूर्यांश शेडगे 8 आणि शशांक सिंग 2 धावांवर स्वस्तात बाद झाले.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स 20 षटकांत 8 बाद 200 (प्रियांश आर्या 22, प्रभसिमरन सिंग 57, कॉनोली 21, ओमरझाई 17 चेंडूत 38, शार्दुल ठाकूर 39 धावांत 4 बळी, दीपक चहर 36 धावांत 2 बळी, रवी बाजवा आणि बॉश प्रत्येकी 1 बळी)
मुंबई इंडियन्स 19.5 षटकांत 4 बाद 205 (रोहित शर्मा 25, रिकेल्टन 48, नमन धीर 9, तिलक वर्मा 33 चेंडूत 6 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 75, रुदरफोर्ड 20, विल जॅक्स 10 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 25, ओमरझाई 2-36, मार्को जान्सेन 1-55, युजवेंद्र चहल 1-32).