For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई इंडियन्सने उघडले विजयाचे खाते

06:50 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबई इंडियन्सने उघडले विजयाचे खाते
Advertisement

दिल्ली कॅपिटल्स 50 धावांनी पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था / नवी मुंबई

कर्णधार हरमनप्रित कौर आणि नॅट सिव्हेर ब्रंट यांची दमदार अर्धशतके तसेच निकोला कॅरे आणि अॅमेलिया केर यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या टी-20 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सने विजयाचे खाते उघडताना दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला.  या सामन्यात हरमनप्रित कौरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा सामना असून त्यांना शुक्रवारी सलामीच्या सामन्यात आरसीबी संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. शनिवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 4 बाद 195 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव 19 षटकांत 145 धावांत आटोपला.

 

मुंबई इंडियन्सच्या डावाला खराब सुरूवात झाली. सलामीची अॅमेलिया केर खाते उघडण्यापूर्वीच डावातील दुसऱ्या षटकात झेलबाद झाली. त्यानंतर कमलिनीने 19 चेंडूत 3 चौकारांसह 16 धावा जमविताना नॅट सिव्हेर ब्रंटसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. मुंबई इंडियन्सची यावेळी स्थिती 2 बाद 51 अशी होती. नॅट सिव्हर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रित कौर या जोडीने खेळाची सुत्रे हाती घेताना तिसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. श्री चरणीने ब्रंटला रॉड्रिग्जकरवी झेलबाद केले. तिने 46 चेंडूत 13 चौकारांसह 70 धावा झळकविल्या. हरमनप्रित कौर आणि निकोला कॅरे यांनी संघाला मजबूत स्थितीत नेताना चौथ्या गड्यासाठी 53 धावांची भागिदारी केली. निकोला कॅरेने 12 चेंडूत 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. हरमनप्रित कौरने 42 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 74 धावांची कप्तानी खेळी केली. मुंबई इंडियन्सच्या डावात 3 षटकार आणि 29 चौकार नोंदविले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे नंदिनी शर्माने 26 धावांत 2 तर हेन्री आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मुंबईने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 43 धावा जमविताना 1 गडी गमविला. ब्रंटने आपले अर्धशतक 32 चेंडूत 10 चौकारांच्यामदतीने तर हरमनप्रितने आपले अर्धशतक 34 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने झळकविले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. दिल्ली कॅपिटल्स संघातील हेन्रीने 33 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 56 धावा झळकविल्या. निकी प्रसादने 1 चौकारांसह 12, स्नेह राणाने 1 षटकारासह 11, श्रीचरणीने 2 चौकारांसह नाबाद 10, लिने 2 चौकारांसह 10, कॅपने 1 षटकार आणि 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. शेफाली वर्मा 8 तर वूलव्हॉर्ट 9 आणि कर्णधार रॉड्रिग्ज 1 धावेवर बाद झाली. मुंबई इंडियन्सतर्फे निकोला कॅरे आणि अॅमेलिया केर यांनी प्रत्येकी 3, नॅट सिव्हर ब्रंटने 29 धावांत 2 तसेच शबनीम इस्माईल व संस्कृती गुप्ता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 5 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. दिल्ली संघाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 35 धावा जमविताना 4 गडी गमविले. हेन्रीने 30 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले.

संक्षिप्त धावफलक: मुंबई इंडियन्स 20 षटकांत 4 बाद 195 (हरमनप्रित कौर नाबाद 74, नॅट सिव्हर ब्रंट 70, कमलिनी 16, कॅरे 21, अवांतर 10, नंदिनी शर्मा 2-26, हेन्री व श्री चरणी प्रत्येकी 1 बळी), दिल्ली कॅपिटल्स 19 षटकांत सर्वबाद 145 (हेन्री 56, ली 10, कॅप 10, निकी प्रसाद 12, स्नेह राणा 11, श्रीचरणी नाबाद, अवांतर 11, कॅरे व केर प्रत्येकी 3 बळी, नॅट सिव्हर ब्रंट 2-29, शबनीम इस्माईल व संस्कृती गुप्ता प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.