For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई इंडियन्सचे जवळपास पॅकअप?

06:58 AM May 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबई इंडियन्सचे जवळपास पॅकअप
Mumbai Indians: Almost Packed Up?
Advertisement

चेपॉकवर चेन्नईचा 8 गड्यांनी दणदणीत विजय :  सामनावीर ऋतुराज गायकवाडच्या नाबाद 67 धावा

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले आहे, तर मुंबई इंडियन्सला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 7 बाद 159 धावा केल्या. यानंतर चेन्नईने दोन गड्यांच्या मोबदल्यातच विजयी टार्गेट पूर्ण केले. दुसरीकडे, यंदाच्या हंगामातील 9 सामन्यातील सातव्या पराभवासह मुंबईने प्ले ऑफचे तिकीट मिळवण्याची संधी गमावली आहे. मुंबईने उर्वरित पाचही सामने जरी जिंकले तरी त्यांचे भवितव्य इतर संघांच्या निकालावर अवलंबून असेल.

Advertisement

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर विल जॅक्स 1 धावा करुन बाद झाला. यानंतर रिकेल्टन आणि नमन धीरने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. रिकेल्टनने 37 धावांची खेळी केली आणि तो माघारी परतला. सूर्यकुमार यादवही फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. त्याला 21 धावा करता आल्या. दुसरीकडे, नमन धीरने सर्वाधिक 37 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारासह 57 धावांचे योगदान दिले. हार्दिक पंड्याने 18 धावा केल्या. इतर फलंदाजानी निराशा केल्याने मुंबईला 20 षटकांत 7 बाद 159 धावापर्यंत मजल मारता आली.

ऋतुराज गायकवाडचा झंझावात

मुंबईने विजयासाठी दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर, स्फोटक फलंदाजी करणाऱ्या उर्विल पटेलला गझनफरने बाद केले. उर्विल पटेलने 12 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या. यानंतर, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्मा यांनी सामना जिंकून देणारी खेळी करत चेन्नईला 8 गडी राखून विजय मिळवून दिला. ऋतुराजने 48 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 67 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. कार्तिकने त्याला उत्तम साथ देताना 40 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 7 बाद 159 (विल जॅक्स 1, रिकेल्टन 37, नमन धीर 57, सूर्यकुमार यादव 21, तिलक वर्मा 5, हार्दिक पंड्या 18, अंशुल कंबोज 3 बळी, नूर अहमद 2 बळी, रामकृष्ण घोष आणि ओव्हर्टन प्रत्येकी 1 बळी)

चेन्नई सुपर किंग्स 18.1 षटकांत 2 बाद 160 (संजू सॅमसन 11, ऋतुराज गायकवाड नाबाद 67, उर्विल पटेल 24, कार्तिक शर्मा नाबाद 54, बुमराह 1 बळी, घनजाफर 1 बळी).

आयपीएलमधून मुंबईचे आव्हान संपुष्टात

या हंगामात चेन्नईने मुंबईविरुद्ध ‘क्लीन स्वीप’ दिला आहे. या विजयामुळे चेन्नईचे 8 गुण झाले असून ते गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या चेन्नईच्या आशा आता जिवंत आहेत. दुसरीकडे, 9 सामन्यांत 7 पराभव स्वीकारलेल्या मुंबई इंडियन्ससाठी बाद फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. मुंबईचा नेट रनरेट फार घसरला असून गुणतालिकेत ते आता नवव्या स्थानी आहेत.

Advertisement
Tags :

.