महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई पदवीधर निवडणूक : ठाकरे -फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला

06:58 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोकण आणि मुंबई या पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबई आणि कोकणातील राजकीय वर्चस्वाची लढाई बघायला मिळणार असून या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची रंगत आता शिगेला पोहचली असून 1988 पासून मुंबई पदवीधर मतदार संघावर वर्चस्व ठेवणारी शिवसेना ठाकरे गट मुंबई पदवीधर मतदार संघ आपल्या ताब्यात ठेवणार का? तसेच लोकसभा निवडणुकीत मुंबईत भाजपला मिळालेल्या अपयशाचा शिक्का देवेंद्र फडणवीस या विजयाने पुसणार या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

Advertisement

लोकसभा निवडणूक संपल्यावर राज्यात आता विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या निवडणुकीसाठी एकुण 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे.

Advertisement

निवडणूक आयोगाने विधान परिषद आणि पदवीधर शिक्षण मतदार संघाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ या 4 जागांकरिता निवडणूक होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात 8, कोकण विभाग पदवीधर मतदार संघात 13, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात 21, तर मुंबईतील शिक्षक मतदारसंघात एकूण 13 उमेदवार आपले भविष्य आजमवणार आहेत. मात्र यातील मुंबई पदवीधर आणि शिक्षक तसेच कोकण पदवीधर निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मुंबईत ठाकरेंच्याच शिवसेनेचा आवाज कायम असल्याचे लोकसभा निवडणुकीत दाखवुन दिले तर कोकणातील ठाणे, रायगड, रत्त्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठाकरेंच्या बालेकिल्यावर महायुतीने शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व मोडत, शिवसेनेला कोकणातून तडीपार केल्याचे भाजपचे नेते बोलत आहेत, मात्र आता कोकण आणि मुंबई शिक्षक तसेच पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही चांगलीच गाजणार आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे अॅड. अनिल परब तर भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होत आहे. विधानसभेच्या आमदारांच्या माध्यमातून राज्यसभेसाठी तसेच विधानपरिषदेसाठी होणाऱ्या जागांसाठीच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आपला करिष्मा दाखविला आहे.

दोन वर्षापूर्वी राज्यसभेच्या जागांसाठी झालेल्या आमदारांच्या मतदानावेळी फडणवीस यांनी अपक्षांची मते फोडत भाजपचे दोन उमेदवार अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक यांना सहज fिनवडून आणले होते, तर विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपने दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात असताना फडणवीस यांनी भाजपच्या पाचही जागा जिंकताना महाविकास आघाडी आणि अपक्षांची मते फोडली होती. या निवडणुकीत भाजपच्या प्रसाद लाड यांचा झालेला अनपेक्षित विजय आणि काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पहिल्या पसंतीचे उमेदवार असताना झालेला धक्कादायक पराभव, ही फडणवीस यांनी केलेली खेळी होती. फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील मते फोडीत विजयश्री खेचुन आणला होता. विरोधीपक्षात असताना फडणवीस विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या आमदारांच्या फोडाफोडीत हिरो ठरले. मात्र राज्यात सत्तापरीवर्तन झाले उध्दव ठाकरेंचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधीपक्षातील तीन पक्षांनी एकत्र येत लढविलेल्या नाशिक, अमरावती पदवीधर तर संभाजीनगर, कोकण आणि नागपूर शिक्षक मतदार संघ या पाच जागांपैकी भाजपला फक्त कोकणातील शिक्षक मतदार संघाची जागा राखता आली. त्यानंतर जो महाविकास आघाडीचा वारू चौफेर उधळला तो कसबा आणि अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीतही कायम होता.

या सगळ्या निवडणुकांचा विचार करता एक गोष्ट लक्षात येते की भाजपची विधानपरिषद किंवा राज्यसभा निवडणूक असो आमदारांच्या फोडाफोडीच्या राजकारणात भाजप नेतृत्वाला नेहमीच यश मिळाले. मुंबई पदवीधर निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांची स्ट्रॅटेजी यशस्वी ठरणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूकही 26 जूनला होत असून ही लढाई चौरंगी होत असल्याने येथे ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात महायुतीतील तीनही पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत, त्यातच गेली 3 टर्म शिक्षक मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या लोकभारतीच्या कपिल पाटील यांचाही उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत मत विभाजनाच्या गणिताचा ज्या शिक्षकाला फायदा होईल तोच शिक्षक या निवडणुकीत पास होईल. कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे निरंजन डावखरे हॅटट्रीक करणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण महाविकास आघाडीतील काँग्रेसने रमेश किर यांना उमेदवारी दिली असून, मनसे नेते अभिजीत पानसे यांनी उमेदवारी अर्ज भरताना डावखरे यांच्या कार्यपध्दतीवर केलेले आरोप तसेच रामनाथ मोते यांच्या शिक्षक संघटनेने यंदा डावखरे यांना पाठिंबा न देता स्वत:चा उमेदवार दिल्याने, डावखरे यांचे या निवडणुकीत डावखरे ठरतीलच हे सांगता येणे कठीण आहे.

मात्र डावखरे यांच्यासाठी जमेची बाजु म्हणजे कोकण पदवीधर मतदार संघ हा मोठा असल्याने या मतदार संघाची व्याप्ती ही थेट ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इतकी मोठी आहे. या भागात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच जिह्यात महायुतीला मोठे यश मिळाल्याने डावखरे यांच्यासाठी नारायण राणे, गणेश नाईक, प्रशांत ठाकुर या भाजपच्या नेत्यांसोबतच राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील या भागातील बलाढ्या आणि प्रस्थापित नेते मंडळी सोबतीला असल्याने डावखरे यांच्यासाठी विजयाची हॅटट्रीक अवघड नाही.

मात्र लोकसभा निवडणुकांचा निकाल बघात मतदार कोणाला साथ आणि कोणाला लाथ देतील हे सांगू शकत नाही. मुंबई पदवीधर निवडणुकीत उध्दव ठाकरे आपली जागा कायम ठेवणार का? आणि कोकणात भाजपाचा विजयाचा वारू राहणार? हे या निवडणुकीत ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रवीण काळे

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article