For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : संगमेश्वरात महामार्गावर चिखलात रुतली वाहने 

12:20 PM Jun 01, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news    संगमेश्वरात महामार्गावर चिखलात रुतली वाहने 
Advertisement
                               पावसाने महामार्गाच्या कामातील त्रुटी उघड, माभळेत गॅस टँकर उलटता उलटता वाचला 
संगमेश्वर ; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर परिसरात अवघ्या १५ मिनिटे झालेल्या पावसाने महामार्गावरील कामकाजातील त्रुटी आणि नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आणला. सोनवी पूल परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने अनेक वाहने चिखलात रुतून बसली तर माभळे येथे एक गॅस टँकर उलटता उलटता बचावल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्यालगत मातीचे ढिगारे साचले असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी जलनिस्सारण व्यवस्था नसल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाला. सोनवी पुलावर इतका चिखल साचला होता की वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मार्गक्रमण करणे कठीण झाले. वाहतूक कोंडीची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करून नव्याने बांधण्यात आलेल्या सोनवी पुलावरून वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत करण्यास मदत झाली.
मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे महामार्ग प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळा तोंडावर असतानाही आवश्यक खबरदारी घेण्यात आलेली नाही. जलनिस्सारण व्यवस्था, चिखल नियंत्रण आणि वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर मुसळधार पावसाच्या काळात काय होणार, अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिकांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 
Advertisement
Advertisement
Tags :

.