Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी जनआक्रोश समितीचा पुन्हा ‘एल्गार’
महामार्गावर ठिकठिकाणी छेडणार आंदोलन
खेड: मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही रखडलेले आहे. या कालावधीत 4 हजार 531 प्रवाशांना हकनाक प्राणास मुकावे लागले असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या सरकारसह ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने पुन्हा ‘एल्गार’ पुकारला आहे. गणेशोत्सवात महामार्गावर ठिकठिकाणी आंदोलने छेडण्यात येणार आहेत. पाटपूजन, पाद्यपूजन सोहळ्यासह महाआरत्यांचाही समावेश आहे.
महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे गेल्या 18 वर्षांपासून प्रवाशांची वाताहत सुरू आहे. विशेषत: सणांच्या कालावधीत गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. या कालावधीत महामार्गावरुन चाकरमान्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. सातत्याने आंदोलने करुनही सरकार सुस्तच आहे. रखडलेल्या महामार्गामुळे दिवसागणिक घडणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. तरीही शासनाला अजूनही महामार्ग पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने लक्ष घालण्याची तसदी घेता येत नाही, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल, अशा प्रतिक्रिया जाणकारांमधून उमटत आहेत.
प्रवाशांना हकनाक प्राणास मुकावे लागल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा गणेशोत्सवात महामार्गावर ‘मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा’चा 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पनवेल-पळस्पे येथे पाटपूजन सोहळा होईल.
17 रोजी दुपारी 2.30 वाजता पेण येथे पाद्यपूजन सोहळा पार पडेल. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता लांजा येथून गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर आंदोलनाला सुरुवात होईल. 28 रोजी दुपारी दुपारी 12 वाजता पाली-रत्नागिरी येथे महाआरती, 29 रोजी संगमेश्वर आगारासमोर, 30 रोजी बहादूरशेख नाका-चिपळूण, 31 रोजी खेड रेल्वेस्थानकाजवळ, 1 सप्टेबर रोजी लोणेरे, दुपारी 2 वाजता माणगाव, रात्री 8 वाजता इंदापूर, 3 सप्टेंबर रोजी कोलाड, 4 रोजी नागोठणे, 5 रोजी दुपारी 2 वाजता पळस्पे व 6 रोजी वर्षा बंगला येथे महाआरत्या होतील.