For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chiplun Accident: कंटेनरच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर!

11:27 AM May 26, 2026 IST | NEETA POTDAR
chiplun accident  कंटेनरच्या धडकेत बाप लेकीचा जागीच मृत्यू  पत्नी गंभीर
Advertisement

गृहप्रवेशापूर्वीच सुखी संसार उद्ध्वस्त

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. कंटेनरने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत ३ वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

Advertisement

कुणाल आग्रे (वय ३५) आणि गार्गी कुणाल आग्रे (वय ३ वर्ष) अशी मृतांची नावे असून, गंभीर जखमी गौरी कुणाल आग्रे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातानंतर चिपळूण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पाठलाग करून कंटेनर चालकाला पकडले

अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक संजय विद्यानंद पांडे (वय ४५, रा. उत्तर प्रदेश) हा कंटेनरसह गोव्याच्या दिशेने पळून जात होता. मात्र, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग केला आणि त्याला शहरातील बहादूरशेख नाका येथे पकडले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

संतप्त नागरिकांचा ३ तास 'रास्तारोको'

या हृदयद्रावक घटनेनंतर वालोपे परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला. "महामार्गावर आणखी किती बळी घेणार?" असा सवाल करत संतप्त जमावाने रविवारी रात्री महामार्ग रोखून धरला. वारंवार होणारे अपघात, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि गतिरोधकांचा अभाव यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाची समजूत काढल्यानंतर तब्बल तीन तासांनी वाहतूक पूर्ववत झाली. तोपर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

गृहप्रवेशापूर्वीच सुखी संसार उद्ध्वस्त

मृत कुणाल आग्रे हे गेल्या काही वर्षांपासून चिपळूण पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून सेवा बजावत होते. अत्यंत कष्टाने त्यांनी वालोपे येथे स्वतःचे हक्काचे घर बांधले होते. घराचे काम अंतिम टप्प्यात असून मे महिन्याच्या अखेरीस त्यांच्या नव्या घराचा गृहप्रवेश सोहळा होणार होता. या आनंदाच्या सोहळ्याची तयारी घरात सुरू असतानाच, गृहप्रवेशाच्या अवघ्या काही दिवस आधीच संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण चिपळूण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, आई-वडील आणि पत्नी असा परिवार आहे.

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.