For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mumbai-Goa Highway वर मिनीबसला गॅसटँकरची मागून धडक, 31 जण जखमी

01:29 PM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
mumbai goa highway वर मिनीबसला गॅसटँकरची मागून धडक  31 जण जखमी
Advertisement

अपघातात 28 शिक्षक व बसचालक व इतर दोघे असे एकूण 31 जण जखमी झाले

Advertisement

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-बावनदी येथे वळणावर घाटात एलपीजी गॅसवाहू टँकर व शिक्षकांना रत्नागिरीकडे घेऊन येणाऱ्या मिनी बसमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. ही घटना रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात 28 शिक्षक व बसचालक व इतर दोघे असे एकूण 31 जण जखमी झाले. यावेळी टँकरमधून गॅसगळती होऊ लागल्याने रस्त्यालगत असलेल्या घराने पेट घेतला.

यामध्ये घराच्या पडवीतील रिक्षा जळली तर म्हैस होरपळून जखमी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातातील तिघा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अपघातामुळे निवळी-बावनदी मार्गे होणारी वाहतूक रात्री उशिरापर्यंत बंद होती. पर्यायी व्यवस्था म्हणून ही वाहतूक पाली-संगमेश्वर मार्गे वळविण्यात आली.

Advertisement

अपघातातील जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले तसेच उपचारासाठी तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. टँकरमधून गॅस गळती होऊ लागल्याने लगतच्या घरानेही पेट घेतला होता. त्यानुसार अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले होते. दरम्यान, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करताच त्या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

शिक्षकांना प्रशिक्षणासाठी रत्नागिरीत घेवून येत होती बस

रत्नागिरीत प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी चिपळूण तालुक्यातील शिक्षक मिनी बसमधून (एमएच 02 आरआर 9609) रत्नागिरीत येत होते. तर एलपीजी टँकर (एनएलओ 1-एन 4628) हा रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने जात होता. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याचे हा मार्ग धोक्याचा बनला आहे.

तसेच रस्त्यावर पाणी असल्याने रस्ताही निसरडा झाला आहे. रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास बावनदी येथील वळणावर टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने बसला जोराची धडक दिली. अपघातात बस रस्त्याखाली असलेल्या दरीत गेली. तर टँकर रस्त्याकडेला कलंडला.

जखमी शिक्षकांचा मदतीसाठी टाहो

टँकरची मिनी बसला जोराची धडक असल्याने आतील शिक्षक जखमी झाले. मदतीसाठी या शिक्षकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मिनी बसचा आपत्कालीन दरवाजा उघडून शिक्षकांना बाहेर काढण्यात आले. तसेच रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा ऊग्णालयाकडे रवाना करण्यात आले.

टँकरमधून गॅस गळती झाल्याने रस्त्यालगतच्या घराला आग

अपघातानंतर टँकरची टाकी रस्त्याकडेला कलंडली तर पुढील भाग मिनी बससोबत रस्त्याच्या खाली गेला. टँकरच्या टाकीमधून गॅस गळती होवू लागल्याने बावनदी परिसरातील रस्त्याकडेला असलेल्या संतोष बेंडखळे यांच्या घराने पेट घेतला. घराच्या पडवीमध्ये बेंडखळे यांची रिक्षा, दोन दुचाकी यांनी पेट घेतला.

तसेच पडवीमध्ये असलेली म्हैस आगीमध्ये होरपळून जखमी झाली. सुदैवाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने घरातील कोणत्याही माणसाला दुखापत झाली नाही. मात्र घराच्या आगीमुळे बावनदी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी

अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होत़ी अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक माऊती जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक पाली-संगमेश्वरमार्गे वळविण्यात आली.

जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी

शिक्षकांच्या मिनी बसला झालेल्या अपघाताची माहिती जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरताच शिक्षकांचे नातेवाईक व शासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. यामुळे ऊग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही ऊग्णांची भेट घेवून विचारपूस केली. तसेच समाजसेवी संघटनांकडून जखमींना पाणी, जेवणाचे पॅकेटस् उपलब्ध करुन दिले.

सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

रत्नागिरी जिह्यात वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी 8 जून रोजी चिपळूणवरून रत्नागिरीकडे खासगी बसने येत असताना शिक्षकांच्या बसचा निवळी येथे अपघात झाला. बसमध्ये एकूण 28 प्रशिक्षणार्थी प्रवास करत होते. सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी जखमींवर उपचार करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात उपस्थित होते, असे जिल्हा परिषद रत्नागिरीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी सांगितले.

अपघाताला प्रशासनाचा आडमुठेपणा जबाबदार : पाटील

वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाला वेळेपूर्वी उपस्थित राहण्यासाठी घाईघाईने येणाऱ्या शिक्षकांच्या गाडीला निवळी-बावनदी येथे अपघात झाला. या अपघाताला शिक्षण विभाग प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे. प्रशिक्षणास उपस्थिती नोंदविण्यास केवळ 5 मिनिटे विलंब झाला. तरीही संबंधित शिक्षकांना प्रशिक्षणातून बाहेर काढण्यात येते. यामुळे त्यांचे प्रशिक्षण चुकत होते.

या नियमाची शिक्षकांनी धास्ती घेतली आहे. प्रशिक्षण तालुकास्तरावर आयोजित करण्यास प्रशासनाचा नकार होता. यामुळे प्रशिक्षणाला लवकर पोहचण्यासाठी शिक्षकांना खासगी गाडीने प्रवास करणे भाग पडले. या घाईमुळेच शिक्षकांना अपघाताला सामारे जावे लागल्याचे कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी व रत्नागिरी जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.