मुंबई-गोवा महामार्गाचे 93-94 टक्के काम पूर्ण; ऑक्टोबरपर्यंत लोकार्पण करणार: गडकरी
पणजी : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, सुमारे 93 ते 94 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगाने पूर्ण करून ऑक्टोबरपर्यंत महामार्गाचे लोकार्पण करण्याचे लक्ष्य असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
मुंबई आणि कोकणाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गाच्या कामाला विविध कारणांमुळे विलंब झाला. भूसंपादन, बांधकामाशी संबंधित अडचणी आणि कंत्राटदारांकडून झालेला विलंब यामुळे प्रकल्प लांबला. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर निलंबन तसेच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा इशाराही गडकरी यांनी दिला.
गडकरी स्वतः मुंबई-गोवा रस्त्याने प्रवास करणार
महामार्गाचे काम योग्य पद्धतीने आणि दर्जेदार झाले आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गडकरी स्वतः मुंबई विमानतळावरून रस्त्याने मुंबई-गोवा प्रवास करणार आहेत. या प्रवासादरम्यान महामार्गाची स्थिती, बांधकामाचा दर्जा आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांची ते पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही गडकरी यांनी महामार्गांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रस्तेमार्गे प्रवास केला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा यांच्यातील रस्ते संपर्क अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे. दीर्घकाळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्णत्वाकडे आता कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.