पहिल्याच पावसात मुंबई पाण्यात
पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले. दहा ते पंधरा दिवस आधीच पावसाला सुरूवात झाल्याने मुंबईतील मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाचा फज्जा उडाला, तर सखल भागातील पाणी काढण्यासाठी असणारे पंपिंग स्टेशन बंद असल्याने शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. ज्याचा परिणाम मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज असताना पावसाचा जोर कमी झाल्याने पुढील संकट टळले. गेल्या 18 वर्षात पहिल्यांदाच मे मध्ये सर धावून आली आहे. अवकाळी पाऊस किंवा परतीच्या पावसाचा फटका राज्यातील काही भागांना बसतो, मात्र मे महिन्यातच आलेल्या पावसाने संपूर्ण राज्यात हाहाकार घातला आहे.
नेमेचि येतो मग पावसाळा याप्रमाणे आता ‘नेमेचि जाते मुंबईत पाण्यात’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षात निसर्गाचे बदललेले चक्र आणि जागतिक तापमान वाढीचा परिणाम बघता, मेच्या मध्यातच राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाल्याचा बघायला मिळाला. मुंबईत दरवर्षी मान्सूनपूर्व कामासाठी करोडो ऊपये खर्च करते. 2024 मध्ये नालेसफाईसाठी 249.27 कोटी ऊपये खर्च केले तर 2025 मध्ये नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 395 कोटी ऊपये खर्च केले. यासाठी 31 कंत्राटदारांना काम दिले पण एवढा पैसा खर्च कऊनही मुंबईतील नालेसफाई झाली नसल्याचे कालच्या पावसाने दाखवून दिले. नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ काढणे हे काम देखील गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे,
मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोर्याची पोलिसांनी कालच चौकशी केली. एका अभिनेत्याची मिठी नदीतील गाळाच्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी होते, यावऊन या कामाच्या खर्चाचा आणि त्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचा अंदाज येतो. याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाख ऊपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेता डिनो मोर्याला समन्स बजावले होते. त्याअंतर्गत त्याला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते.
मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मागील वीस वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून 1100 कोटी ऊपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या काळात एकूण 18 कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. त्यापैकी अनेकांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एसआयटीने याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह काही कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात ईडीनेही उडी घेतली असून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी करोडो ऊपये खर्च कऊनही दरवर्षी मुंबई गाळातच जाते, कालच्या पावसात पालिकेच्या कामाचे सारे दावे फोल ठरले आहेत.
मान्सून वेळेआधीच दाखल झाल्याने जो गाळ नाल्यातून काढला तो पुढील आठ दिवसात उचलण्यात येणार होता, तो गाळ पुन्हा नाल्यात गेला आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न, दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन तसेच नाल्याशेजारी राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करणे ह्या गोष्टी अजुन बाकी आहेत, पहिल्याच पावसाने मुंबईतील सर्व रस्ते पाण्याखाली गेले. भुयारी मेट्रो मार्ग पाण्याखाली गेल्याने मेट्रोचा दरवाजा उघडताच तळ्याचे स्वऊप मेट्रो स्टेशनला आले होते. त्यामुळे आता पहिल्या पावसानंतर नेहमीप्रमाणे राजकारण सुरू झाले असून, पावसाच्या सरीनंतर आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरींना सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पालिकेच्या कारभारावऊन भाजपवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी देखील भाजपवर टीका केली तर भाजपचे आशिष शेलार यांनी देखील आदित्य ठाकरेंवर टीका करताना मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि कंत्राटदाराने मुंबईला लुटल्याचा आरोप केला. महापालिकेवर 1985 पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 संपली आहे. पालिकेचे कारभारी आता प्रशासन असून, मुंबई महापालिकेच्या विविध बँकात तब्बल 92 हजार कोटींच्या मुदत ठेवी जमा होत्या. मात्र गेल्या अडीच वर्षात महापालिकेने दोन लाख कोटींची कामे हातात घेतल्याने तब्बल 11 हजार कोटीच्या ठेवी मोडीत काढल्या आहेत. आता बँकात 81 हजार कोटीच्या ठेवी जमा आहेत,
यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार 16 हजार 699 कोटी रूपयांच्या ठेवी आणखी मोडीत काढण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला (ठाकरे) लक्ष्य करण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा आहे. पहिल्याच पावसाने मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामाचे पहिले पाढे 55 असेच चित्र दिसते.
जनतेच्या पैशावर कंत्राटदार व सत्ताधारी डल्ला मारतात, राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा बिघडलेला पोत लक्षात घेता, छोट्यात छोटा मुद्दा हा राजकारणाचा मुद्दा केला जात आहे. नैसर्गिक आपत्ती हे राज्यासमोरील मोठे संकट ठरत आहे. राज्याच्या तिजोरीवर एकीकडे लाडकी बहीण योजना, अनेक मोफत योजनांमुळे सरकारवर भार पडत आहे. त्यातच बहुजन कल्याण विभागाचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेला. गेल्या चार दिवसात झालेल्या पावसाने राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देणे सरकारपुढे मोठे आव्हान असेल.
प्रवीण काळे