मुंबई प्रवेश टोलमुक्त
राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
प्रतिनिधी/ मुंबई
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने अनेक निर्णय भराभर घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याच धर्तीवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करताना पाच ठिकाणी आकारण्यात येणारा हलक्या वाहनांवरील टोल माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. सोमवार, 14 रोजी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नागरिकांना ही दिवाळी भेट असल्याचे समजले जात आहे.
हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस यांना ही पथकरातून सूट राहील. सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथे, लालबहादूर शास्त्राr मार्गावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे, ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील पथकर नाक्यावर याची अंमलबजावणी होईल. पथकरातून सूट दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळास द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरून जाताना लहान वाहनांवर टोलचा भार होता. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल घेतला जाणार नाही.
या वर्षाच्या सुरुवातीला, या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांचा टोल 45 रुपये करण्यात आला होता. दर तीन वर्षांनी टोलवाढीच्या नियमांतर्गत ही वाढ करण्यात आली होती. सन 2000 पासून मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत. शहरातील उ•ाणपुलांच्या बांधकामाशी संबंधित खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टोल लागू केला होता. मात्र आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा टोल रद्द करण्यात आला आहे.
टोलमाफी हे मनसेच्या आंदोलनाचे यश - राज ठाकरे
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला टोलमाफीचा निर्णय हे मनसेच्या आंदोलनाचे यश आहे, असा दावा करतानाच आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो; त्यांना टोकाचे पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही, असा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलमाफीवर प्रतिक्रिया दिली आहे. टोलमाफीचा निर्णय होताच राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मनसैनिकांचे अभिनंदन केले आहे. आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आले ही आनंदाची बाब आहे. यासाठी राज्य सरकारचे अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी, असा सल्लाही या पोस्टमध्ये दिला आहे.