'मुंबई महाराष्ट्राची नाही' ही राजकीय वावटळ ; आली तशीच निघूनही गेली
सौ. मंगल नाईक-जोशी
सावंतवाडी
महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी गोडवा गायलेली 'मराठी' ही या मुंबईची राजभाषा आहे. त्यामुळेच रोजगाराच्या प्रतीक्षेत असणारा गावाकडील माणुस आजही हक्काने मुंबईची वाट धरतो. ग्रामीण भागात राहणारी आमच्यासारखी माणसे भलेही मुंबईत वास्तव्यास नसली तरी मुंबई आपली आहे, ही भावना आपोआप मनात रुजलेली आहे. बालपणीच्या कोऱ्या पाटीवर ते कुणी मुद्दामहून कोरलेले नाही. याचे कारण प्रत्येक घरातील जवळचे माणूस मुंबईत आहे. मुंबईतील आपत्ती, मुंबईवरील दहशतवादी हल्ले, मुंबईवरचे कोणतेही संकट इथे प्रत्येकाला आपले स्वतःचे वाटते. जितकी मुंबई हळहळते, तितकाच इथला माणुस हळहळतो. याचे कारण मुंबईची नाळ मराठी माणसाच्या मनाशी अतूटपणे जोडली गेलेली आहे. त्यामुळे अशा विधानाने भविष्याची अनामिक चिंता मनात आल्याशिवाय राहत नाही.
महाराष्ट्राची मुंबई!
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, हा अवघ्या महाराष्ट्राचा गौरव आहे. कारण मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. खरे तर, नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'मुंबई महाराष्ट्राची नाही' असे विधान निघाले. त्यावर चर्चा, प्रतिक्रियांची अक्षरशः झोड उठली. पण ती नेहमीसारखीच राजकीय वावटळ होती. ती आली तशीच निघूनही गेली. पण साहजिकच महाराष्ट्रीयन माणसाच्या डोक्यात मात्र विचारांचे वारे थयथयाट करु लागले. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असताना अजूनही ही विधाने होऊच कशी शकतात, हा प्रश्न मनात उभा राहिला. भलेही भौगोलिकदृष्ट्या मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असली तरीही ती महाराष्ट्राला सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी रक्त सांडावे लागले. सन १९५६ मध्ये सुरू झालेला तो केवळ शाब्दिक संघर्ष नव्हता, तर मुंबईसाठी प्राणपणाने लढलेली लढाई होती. त्यात १०५ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. आता पुन्हा एकदा 'मुंबई महाराष्ट्राची नाही', या विधानाने महाराष्ट्रीयनास अंतर्मुख करण्यास भाग पाडले. आणि तो धगधगता इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. मराठी भाषक जनतेसाठी ज्यांनी-ज्यांनी ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली, त्या सर्वांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. याबाबत प्रत्येकाने कृतज्ञ असायला हवे.
मुंबईची मागणी मराठी माणसासाठी !
खरे सांगायचे तर, 'हा प्रांत माझा-तो प्रांत माझा' अशी भावना बाळगणारा संकुचित दृष्टीकोन भारतीय नागरिक म्हणून अजिबात नाही. महाराष्ट्रासाठी संघर्ष करणाऱ्या विचारवंतांचा-चळवळकर्त्यांचाही तो नव्हता. कारण, कोणत्याही समाजाच्या एकसंधतेचे 'भाषा' हे प्राथमिक माध्यम असते. समान भाषा बोलणाऱ्यांची संस्कृती, जीवनशैली यात साधर्म्य असते. आपलेपणा असतो. त्यामुळे ते गुण्यागोविंदाने नांदतात. यासाठीच 'एक भाषा-एक राज्य' संकल्पना पुढे आली होती. आणि म्हणून मराठी भाषकांचे एक राज्य असावे, अशी ती मागणी होती. राहता राहिला मुंबईचा प्रश्न.. तर संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दार कमिशनला सांगितले होते, 'मुंबईमध्ये मराठी भाषा बोलली जाते. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात असायला हवी.' मुंबईची मागणी ही हव्यासापोटी झालेली नव्हती. तिथे मोठ्या संख्येने असणाऱ्या मराठी माणसाच्या न्यायासाठी, हक्कासाठी ती होती.
मुंबई मराठी माणसाची!
अरबी समुद्राच्या लाटा झेलत उभी असणारी मुंबई मराठी माणसाला मराठी माणसांनी अपरिमित संघर्ष करून दिली आहे. 'महारठ्ठ' प्रदेशात (महाराष्ट्र) राहणाऱ्या माणसाला मराठा म्हणून ओळखतात. या मराठी माणसाची ही राजधानी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून प्रत्येकाचे स्वकीय, आप्त मुंबईला आहेत. कोकणात तर असे एक घर आढळणार नाही की, त्या घरातील माणुस नोकरीसाठी मुंबईत नाही. वर्षानुवर्षे मुंबईच्या अर्थकारणात ही माणसे मोठा हातभार लावत आली आहेत. महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी गोडवा गायलेली 'मराठी' ही या मुंबईची राजभाषा आहे. त्यामुळेच रोजगाराच्या प्रतीक्षेत असणारा गावाकडील माणुस आजही हक्काने मुंबईची वाट धरतो. ग्रामीण भागात राहणारी आमच्यासारखी माणसे भलेही मुंबईत वास्तव्यास नसली तरी मुंबई आपली आहे, ही भावना आपोआप मनात रुजलेली आहे. बालपणीच्या कोऱ्या पाटीवर ते कुणी मुद्दामहून कोरलेले नाही. याचे कारण प्रत्येक घरातील जवळचे माणूस मुंबईत आहे. मुंबईतील आपत्ती, मुंबईवरील दहशतवादी हल्ले, मुंबईवरचे कोणतेही संकट इथे प्रत्येकाला आपले स्वतःचे वाटते. जितकी मुंबई हळहळते, तितकाच इथला माणुस हळहळतो. याचे कारण मुंबईची नाळ मराठी माणसाच्या मनाशी अतूटपणे जोडली गेलेली आहे. त्यामुळे अशा विधानाने भविष्याची अनामिक चिंता मनात आल्याशिवाय राहत नाही.
मुंबईची ओळख
एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसुधारक नानासाहेब जगन्नाथ शंकरशेठ या मराठी व्यक्तीला 'मुंबईचे शिल्पकार' म्हणून ओळखले जाते. याचे कारण मुंबईतील पायाभूत सुविधा निर्माण करण्यात त्यांचे अनमोल योगदान आहे. मुंबईत रेल्वे, स्त्री शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉस्पीटल उभारणी, इ. मध्ये त्यांचे मोठे आर्थिक, सामाजिक योगदान आहे. नाना शंकरशेठ हे मुळचे ठाणे जिल्ह्यातील कोसबाडचे होते. मुंबई हे महानगर आहे. इथे देशाच्या सर्वच प्रांतातील लोक रोजगारासाठी राहतात. त्यामुळे त्यांचेही मुंबईच्या प्रगतीत योगदान आहे. पण जसे महाराष्ट्रीयन इतर प्रांतात नोकरीधंद्यास जातात. पण तिथल्या भूमीवर अधिकार गाजवू पाहत नाहीत. तसेच हे असायला हवे, खरे तर! मुळात मराठी माणूस पहिल्यापासूनच चाकरमानी राहिला. त्याच्या श्रमावर येथे परप्रांतीय भांडवलदारांनी उद्योग-व्यवसाय उभारले. अनेक गिरण्या येथे आल्या, तशाच या कामगारास वाऱ्यावर टाकून निघूनही गेल्या.
मुंबई हे माहीम, वरळी, परळ, माझगाव, कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई या सात बेटांचे शहर आहे. ब्रिटिशांनी या बेटांमधील खाड्या, खाजणे बुजविण्याची मोहीम टप्प्याटप्याने राबविली. सातवाहन, राष्ट्रकुट, मौर्य, गुजरात सल्तनत यांचे राज्य या बेटांनी अनुभवले. जेव्हा जागतिक स्तरावरील वसाहतवादी राजकारणाचे वारे भारतात शिरले, तेव्हा इथे आलेल्या पोर्तुगीजांनी हे बेट जिंकले. पुढे पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन हिचा विवाह इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्याशी झाला. तेव्हा पोर्तुगालने हे बेट ब्रिटिशांना आंधण म्हणून दिले. ब्रिटिश शासनाच्या ईस्ट इंडिया कंपनीने या बेटांसहीत भोवतालच्या परिसरास 'बॉम्बे प्रेसिडन्सी' प्रांत असे नाव दिले. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार भारताचे वेगवेगळ्या प्रांतात विभाजन केले होते. पुढे स्वातंत्र्यानंतर १९६० पर्यंत महाराष्ट्र व गुजरात मिळून 'बॉम्बे राज्य' अस्तित्वात होते.
साहित्यिकांकडून जागर
दरम्यान, ब्रिटिश राजवटीतच देशात भाषावार प्रांतरचना करावी, अशी मागणी वर येऊ लागली होती. त्यावेळेस मराठी भाषिकांसाठीही मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीची मागणी व्यक्त होऊ लागली. विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी त्यांच्या 'थ्री डिव्हिजनस ऑफ महाराष्ट्र' या लेखात म्हटले होते- 'मराठी लोक हे महाराष्ट्र, विदर्भ, हैद्राबाद व गोवा येथे पसरले आहेत. त्या सर्वांचा मिळून महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे.'
सन १९२० मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी भाषावार प्रांतरचनेचा विषय मान्य केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही याच मताचे होते. या मुद्द्यावरून त्यांनी जनजागृतीही केली होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेदेखील भाषावार प्रांतरचनेचे पुरस्कर्ते होते. सन १९३८ मधील मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वऱ्हाड हा प्रांत महाराष्ट्रात घ्यावा, असे नमूद केले. त्यानंतर इ. स.१९४६ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीसाठी प्रत्यक्ष 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यिकांनी पाठविले. त्याला राजकीय नेतेमंडळींनीही पाठिंबा दर्शविला. १९४९ पर्यंत या मागणीचे पडघम वाजत होते. मुंबई महापालिकेत १९४९ मध्ये आचार्य प्र. के. अत्रे व डॉ. आर. डी. भंडारे यांनी मुंबईसह महाराष्ट्रचा ठराव मांडला होता.
सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर संघर्ष
खरे तर, पूर्वी काँग्रेसच्या अधिवेशनात भाषावार प्रांतरचना मान्य करणारे पं. जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय एकात्मतेस धोका या संभाव्य शक्यतेने या मागणीस नंतर विरोध दर्शवीत होते. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांमधून अशा सर्व घटना प्रतिबिंबित होऊ लागल्यावर शासकीय पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या. यापैकी सन १९४८ मध्ये स्थापन झालेल्या दार कमिशनने भाषावार प्रांतरचनेस विरोध दर्शविला. त्यानंतर यासंदर्भातील जे. व्ही. पी. कमिटीनेही मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध केला. १९५३ मध्ये फाजल अली आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाच्या अहवालात वेगवेगळी तत्वे लागू करण्यात आली. मुंबई महाराष्ट्राला देण्याचे या आयोगानेही अमान्य केले. त्यानंतर मात्र महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला. पंडित नेहरूंनी स्वतंत्र मुंबई, सौराष्ट्रासह गुजरात व विदर्भासह महाराष्ट्र अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. त्यानंतर महाराष्ट्र पेटून उठले. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,' या घोषणेने मराठी भाषिक प्रांत दणाणून उठला. आचार्य अत्रे यांनी दैनिक 'मराठा' मधून या निर्णयाविरोधात झोड उठवली. भारताचे अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी राजीनामा दिला. एस. एम. जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, भाई उध्दवराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शंकरराव देव, बापूसाहेब हिरे, ना. ग. गोरे आदींनी मागणी मान्य होईपर्यंत ही चळवळ तेवत ठेवली. हा संघर्ष पेटला होता. लोकांनी आंदोलने पुकारली. सत्याग्रह, मोर्चे सुरु झाले. न. चिं. केळकर, रामराव देशमुख अशी अनेक मंडळी या संग्रामात उतरली. खरे तर नावांची मांदियाळी फार मोठी आहे.
अर्थात, मुंबईसाठी मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. सरकारने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात १०५ जण हुतात्मे झाले. १९६० पर्यंत हा विषय धगधगतच राहिला. परंतु, कुणीही मागे हटले नाही.
मुंबई ही महाराष्ट्राचीच असतानाही ती दूर जाण्याची जेव्हा वेळ आली, तेव्हा येथील राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्राची अस्मिता जपणारी नेतेमंडळी, कलावंत, पत्रकार इथपासून ते महाराष्ट्रीयन नागरिकास रणांगणात उतरावे लागले.
अखेरीस, जनआंदोलनापुढे सरकारला नमते घ्यावेच लागले. त्या दिवसाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाली. महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण 'मुंबईसह महाराष्ट्र' राज्याचा कलश दिल्लीतून घेऊन आले.
१ मे,१९६० ला 'मुंबईसह महाराष्ट्र' ची निर्मिती झाली.