मुंबई, दिल्लीसमोर आज घसरण रोखण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था /मुंबई
आयपीएल’च्या आज रविवारी येथे होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुकाबला होणार असून दोन्ही संघांचे प्रमुख लक्ष्य आपली घसरण रोखणे हे राहणार आहे. पुन्हा एकदा फिट झालेल्या सूर्यकुमार यादवकडून त्यादृष्टीने लगेच चांगल्या कामगिरीची अपेक्षा संघ व्यवस्थापन बाळगून असेल. सलग तीन पराभवांसह मुंबईचा संघ तळाशी आहे, तर दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या मागील सामन्यात 106 धावांनी पराभूत झाल्यानंतर 10 संघांच्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचले आहे. एकीकडे मुंबईने नेहमीप्रमाणे खराब सुरुवात केलेली आहे, तर दिल्ली कॅपिटल्सला चार सामन्यांत तीन पराभव सहन करावे लागले आहेत आणि परत उसळी घेण्याचा दबाव त्यांच्यावर आहे. सूर्यकुमारचे पुनरागमन त्याला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघातील स्थानासाठीच्या शर्यतीत ठेवेल.
मुंबईच्या वरच्या फळीत रोहित शर्मा आणि इशान किशन हे दोघेही आश्वासक दिसत असले, तरी दोघांनीही अद्याप मोठी धावसंख्या उभारलेली नाही. तिलक वर्मा आणि नमन धीर हेही मधल्या फळीत कितीही आकर्षक दिसले, तरी अद्याप सामना जिंकून देणारी कामगिरी ते करू शकलेले नाहीत. गडबडलेला कर्णधार हार्दिक पंड्याही त्याच्या बाजूने प्रेरणा देऊ शकलेला नाही. त्यांच्या मागील सामन्यात आकाश मधवालने घेतलेले 3 बळी ही गोलंदाजीतील एकमेव सकारात्मक बाजू राहिली. या लढतीत मुंबईने पॉवरप्लेमध्ये जसप्रीत बुमराहला तीन षटके देऊन त्याला वापरण्याची पद्धत बदलली. परंतु राजस्थान रॉयल्सला आव्हान देण्याइतक्या पुरेशा धावा त्यांना जमविता आल्या नाहीत. दिल्लीसाठी पुनरागमन केलेला स्टार रिषभ पंतने (152 धावा) सलग दोन अर्धशतकांसह सातत्य राखले आहे, परंतु त्याला इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. डेव्हिड वॉर्नर (148 धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स हे इतर फलंदाजांच्या तुलनेत किंचित सरस ठरले आहेत. पण वानखेडे स्टेडियम हा होमग्राऊंड असलेल्या पृथ्वी शॉकडून दिल्लीला आज अधिक चांगल्या कामगिरीची आशा बाळगता येईल. मिचेल मार्श आतापर्यंत दिल्लीच्या चारही सामन्यांपैकी खेळला आहे. पण त्याला छाप पाडता आलेली नाही.
संघ: मुंबई इंडियन्स-हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियूष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वुड.
दिल्ली कॅपिटल्स-रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, एन्रिक नॉर्टजे, कुलदीप यादव, जेक फ्रेजर-मॅकगर्क, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्र, रसिक दार, रिचर्डसन, सुमित कुमार, स्वस्तिक चिकारा, शाई होप.
सामन्याची वेळ : दुपारी 3.3 वा.