मुंबईचा हैदराबादवर नऊ गड्यांनी विजय
वृत्तसंस्था/ हैदराबाद
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या इलाईट ड गटातील सामन्यात मुंबईने यजमान हैदराबादचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. मुंबईच्या पहिल्या डावात द्विशतक झळकाविणाऱ्या सर्फराज खानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 507 धावा जमविल्या. त्यानंतर हैदराबादचा पहिला डाव 267 धावांत मुंबईने 293 धावांची भक्कम आघाडी मिळविली. मुंबईकडून हैदराबादला फॉलोऑफ स्वीकारावा लागला. हैदराबादने 7 बाद 166 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला आणि आपल्या दुसऱ्या डावाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 302 धावांत आटोपला. हैदराबादच्या डावामध्ये चेमा मिलिंदने 128 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांसह 85 तर हिमतेजाने 6 चौकारांसह 43, राहुल सिंगने 2 षटकार आणि 5 चौकारांसह 33, नितीन यादवने 6 चौकारांसह 32 आणि कर्णधार मोहम्मद सिराजने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 32 धावा जमविल्या. दुसऱ्या डावामध्ये हैदराबादच्या शेवटच्या 3 फलंदाजांनी 136 धावांची भर घातली. मुंबईतर्फे मुशिर खानने 79 धावांत 5, मोहित अवस्थीने 47 धावांत 3 तर ओंकार तरमले 48 धावांत 2 गडी बाद केले. मुंबईला निर्णायक विजयासाठी केवळ 10 धावांची गरज होती. मुंबईने दुसऱ्या डावात 1 बाद 12 धावा जमवित सामना 9 गड्यांनी जिंकला.
संक्षिप्त धावफलक - मुंबई प. डाव 560, हैदराबाद प. डाव 267, हैदराबाद दु. डाव सर्वबाद 302 (चेमा मिलिंद 85, हिमतेजा 43, राहुल सिंग 33, नितीन यादव 32, मोहम्मद सिराज 32, अवांतर 35, मुशिर खान 5-79, अवस्थी 3-47, तरमले 2-48), मुंबई दु. डाव 3.2 षटकात 1 बाद 12 (हेरवाडकर 4, आकाश आनंद नाबाद 5, हिमांशु सिंग नाबाद 1, यादव 1-6).