For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शांताईच्या आजी-आजोबांना घडविणार मुंबई दर्शन

10:04 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
शांताईच्या आजी आजोबांना घडविणार मुंबई दर्शन
Advertisement

बेळगाव : शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना 22 ते 26 फेब्रुवारीदरम्यान मुंबई दर्शन घडविण्यात येणार आहे. विशेषत: बेळगाव-मुंबई हा प्रवास विमानाने केला जाणार आहे. त्यामुळे आजी-आजोबांना विमानाचा आनंद लुटता येणार आहे. येथील पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत, अशी माहिती शांताईचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शांताई वृद्धाश्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने प्रत्येक महिन्याला एक उपक्रम हाती घेतला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आजी-आजोबांना मोठ्या शहराचे दर्शन घडविले जाणार आहे. याचबरोबर अयोध्या येथील रामलल्लाचे दर्शन घडविण्याबाबतही आपला मानस असल्याचे ते म्हणाले. मुंबई दर्शनमध्ये गेट वे ऑफ इंडिया, हॉटेल ताजमहाल, अटलसेतू, महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, जुहू चौपाटी आदी ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. मुंबई दर्शन दौऱ्यामध्ये 40 आजी-आजोबांचा सहभाग असणार आहे. विशेषत: त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. मुंबई दर्शनसाठी अनिल जैन, स्टार एअरचे मालक संजय घोडावत, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांच्यासह इतरांचे सहकार्य लाभले आहे. सर्वसामान्य माणसांबरोबर वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनाही सहलीचा आनंद लुटता यावा, यासाठी मुंबई दर्शन घडविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संतोष ममदापूर, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, पत्रकार राजू गवळी, अॅलन मोरे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.