For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईत थरार..! पोलिसांनी सोडलं, अन् त्यांचीच गाडी घेऊन तरुण फरार, अनेक वाहनांना धडक

02:54 PM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबईत थरार    पोलिसांनी सोडलं  अन् त्यांचीच गाडी घेऊन तरुण फरार  अनेक वाहनांना धडक
Advertisement

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर गुरुवारी पहाटे एका तरुणाने केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे मोठा गोंधळ उडाला. सुरुवातीला विरुद्ध दिशेने कार चालवल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुणाने सुटका झाल्यानंतर थेट पोलिसांचीच कार पळवल्याची घटना समोर आली आहे. कार घेऊन पसार होताना त्याने भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे.

Advertisement

विरुद्ध दिशेने कार चालवताना पोलिसांनी पकडलं

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे एक तरुण कोस्टल रोडवर वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने कार चालवत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला कारसह ताब्यात घेतले. काही वेळाने त्याला सोडण्यात आले.

मात्र, सुटका झाल्यानंतरही त्याचा गोंधळ थांबला नाही. तो पुन्हा कोस्टल रोड परिसरात आला आणि त्याची नजर पोलिसांच्या एका वाहनावर पडली.

Advertisement

पोलिसांचीच कार घेऊन पळाला

पोलिसांचे वाहन काही काळ चालकाविना उभे असल्याचे तरुणाच्या लक्षात आले. वाहनामध्ये चावी असल्याची संधी साधत त्याने थेट पोलिसांची कार सुरू केली आणि तेथून पळ काढला.

घटना लक्षात येताच पोलिसांनी तातडीने वायरलेस संदेशाद्वारे संबंधित वाहनाचा क्रमांक आणि संशयित तरुणाचे वर्णन मुंबईतील इतर पोलीस पथकांना कळवले. त्यानंतर विविध ठिकाणी पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न सुरू केला.

पोलिसांचा पाठलाग, वाहनांना धडक

पोलिसांनी थांबण्याचे आदेश दिल्यानंतरही तरुणाने कारचा वेग वाढवत पळण्याचा प्रयत्न केला. भरधाव कार चालवत असताना त्याने काही वाहनांना धडक दिल्याची माहिती आहे.

याचदरम्यान कार दुभाजकाला घासली. रस्त्यावर लावण्यात आलेले बॅरिकेड्सही त्याने तोडले. एवढेच नव्हे, तर पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या आणखी एका वाहनालाही त्याने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकारामुळे पहाटेच्या वेळी कोस्टल रोड परिसरात मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी मात्र पाठलाग सुरूच ठेवला.

मलबार हिल परिसरात अखेर ताब्यात

अखेर पोलिसांनी मलबार हिल परिसरात संबंधित वाहनाला अडवून तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकाराचा तपास केला जात आहे.

पोलिसांच्या वाहनाचा वापर करून पसार होणे आणि त्यानंतर इतर वाहनांना धडक देत भरधाव कार चालवणे यामुळे या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.