For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक; संपर्कातील व्यक्तींकडे केली पैशांची मागणी

05:19 PM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक  संपर्कातील व्यक्तींकडे केली पैशांची मागणी
Advertisement

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर भामटे संपर्कातील व्यक्तींना संदेश पाठवत पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. भिडे यांनी स्वतः सामाजिक माध्यमातून याबाबत माहिती देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

अश्विनी भिडे यांनी सांगितले की, त्यांचे व्हॉट्सॲप खाते ताब्यात घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्या क्रमांकावरून कोणालाही आर्थिक मदत किंवा अन्य कोणत्याही प्रकारची मदत मागणारा संदेश आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

पैशांची मागणी करणाऱ्या संदेशांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

भिडे यांच्या नावाने अनोळखी किंवा संशयास्पद संदेश आल्यास कोणतीही रक्कम पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः तातडीने पैसे पाठवण्याची विनंती करणारे संदेश आल्यास संबंधित व्यक्तीशी दुसऱ्या विश्वासार्ह माध्यमातून संपर्क साधून खात्री करावी, असा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जातो.

Advertisement

यापूर्वी शायना एनसी यांचेही खाते झाले होते हॅक

अशाच प्रकारची घटना गेल्या महिन्यात शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्त्या शायना एनसी यांच्यासोबतही घडली होती. त्यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक करून त्यांच्या संपर्कातील मित्र, सहकारी आणि हितचिंतकांना आर्थिक मदतीसाठी संदेश पाठवण्यात आले होते.

या प्रकरणी शायना एनसी यांनी मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करून प्रथम माहिती अहवाल नोंदवला होता. त्यांनी सामाजिक माध्यमातूनही आपले खाते हॅक झाल्याची माहिती देत त्यांच्या क्रमांकावरून पैशांची मागणी करणारे संदेश आल्यास त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते.

सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

व्हॉट्सॲप किंवा सामाजिक माध्यमावरील खाते ताब्यात घेतल्यानंतर सायबर भामटे संबंधित व्यक्तीच्या संपर्क यादीतील लोकांना संदेश पाठवून पैसे, वैयक्तिक माहिती किंवा अन्य मदत मागू शकतात. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीच्या क्रमांकावरून संदेश आला तरी तो संशयास्पद वाटत असल्यास त्याची खातरजमा करणे आवश्यक आहे.

विशेषतः पैशांची मागणी करणाऱ्या संदेशांवर तातडीने विश्वास ठेवू नका. दूरध्वनी करून किंवा अन्य विश्वासार्ह माध्यमातून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून विनंती खरी आहे की नाही, याची खात्री करा. तसेच एकदाच वापरता येणारा संकेतांक, संकेतशब्द किंवा अन्य गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नका.

Advertisement
Tags :

.