आयएसएल फुटबॉल: मुंबई सिटी क्लब नॉर्थईस्टकडून पराभूत
क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने मुंबईत मुंबई फुटबॉल एरिनावर खेळविण्यात आलेल्या लढतीत मुंबई सिटी एफसीचा 3-0 असा पराभव केला. या विजयाने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला 3 गुण मिळाले.
या सामन्यात पहिल्याच मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा हुकमी स्ट्रायकर अलादीन अझाराईने गोल केला व संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 83व्या मिनिटाला अलादीन अझाराईने मॅकार्टन लुईस निक्सनने दिलेल्या पासवर संघाचा दुसरा गोल केला. तीनच मिनिटानंतर मॅकार्टन लुईस निक्सनने जबरदस्त फटका हाणून नॉर्थईस्ट युनायटेड एफसीच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला. या विजयाने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे आता 13 सामन्यांतून 6 विजय, 3 बरोबरी व 4 पराभवांनी 21 गुण झाले असून ते आता चौथ्या स्थानावर आले आहेत. मुंबई सिटी एफसीचा हा तिसरा पराभव ठरला. त्यांचे आता 13 सामन्यांतून प्रत्येकी 5 विजय व बरोबरीने 20 गुण झाले असून ते सातव्या स्थानावर आहेत.