मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ! रिक्षा-टॅक्सी भाड्यात वाढ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार
मुंबई : मुंबई आणि परिसरातील नागरिकांना रिक्षा आणि टॅक्सी प्रवासासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतीसह वाहनांच्या देखभाल खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबरपासून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात हे नवे दर लागू होणार आहेत.
नव्या निर्णयानुसार, रिक्षाच्या किमान भाड्यात 1 ची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत 26 असलेले किमान भाडे आता 27 होईल. दुसरीकडे, काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 ची वाढ करण्यात आली असून, प्रवाशांना आता किमान 33 मोजावे लागतील.
भाडेवाढीमागे कारण काय?
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भाडेवाढ झाल्यानंतर पुन्हा एकदा रिक्षा आणि टॅक्सीचे दर वाढवण्यात आले आहेत. इंधन आणि सीएनजीच्या किमतीतील चढ-उतार, वाहनांच्या देखभालीचा वाढता खर्च, कर्जावरील व्याज तसेच विविध सरकारी कर यांचा परिणाम चालकांच्या उत्पन्नावर होत असल्याचे सांगण्यात आले.
सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीनंतर रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर संबंधित प्राधिकरणाच्या बैठकीत या मागणीवर चर्चा करण्यात आली.
समितीच्या शिफारशींचा आधार
भाडे निश्चित करताना बी. सी. खटुआ समितीने केलेल्या शिफारशींचा आधार घेण्यात आला आहे. इंधनाचा खर्च, वाहनाची किंमत आणि देखभाल, कर्जावरील व्याज तसेच कर यांसारख्या विविध बाबींचा विचार करून सुधारित भाडे निश्चित करण्यात आले आहे.
या निर्णयाची अधिकृत अधिसूचना संबंधित परिवहन विभागाकडून लवकरच प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. भाडेवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वाढत्या खर्चातून काहीसा दिलासा मिळणार असला, तरी दररोज सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या मुंबईकरांच्या मासिक खर्चात मात्र आणखी भर पडणार आहे.