साताऱ्यात होणार बहुमजली पार्किंग
सातारा :
सातारा शहरात राजवाडा परिसरात भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न आता सुटणार आहे. राजवाड्याच्या परिसरात पालिकेच्यावतीने सेंट्रल पार्क आणि बहुमजली पार्किंग प्रस्तावित करण्यात येणार आहे. हे काम काही दिवसात मार्गी लागणार असून त्यामुळे साताऱ्याच्या या ऐतिहासिक अशा ठिकाणाला एक वेगळाच लुक येणार आहे. त्याचबरोबर पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे. त्याकरता जिल्हा परिषदेच्या मालकीची असणारी जागा पालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्याकरता सातारा पालिकेचा तसा प्रयत्न सुरु आहे. या कामाचा आराखडा सुद्धा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे राजवाडा परिसरातील पार्किंगचा प्रश्न निकाली निघणार आहे.
सध्या साताऱ्यात राजवाडा परिसरात दुचाकी वा चार चाकी लावण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. आळूच्या खड्ड्यात काही वाहने उभी असतात तर काही वाहने गांधी मैदानाच्या कोपऱ्यात उभी असतात. गांधी मैदानावर हातगाडे असतात. अजिंक्य गणेश मंदिराच्या समोरही काही हातगाडे आणि दुचाकी वाहने उभी केलेली असतात. अजिंक्य गणेश मंदिराच्या लगत असलेल्या पालिकेच्या पार्किंगमध्ये वाहने पार्क केलेली नसतात. पार्किंगची समस्या त्या परिसरात सतत भेडसावत असते. पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी सातारा पालिकेने याच परिसरात पालिकेच्या जागेत प्रस्तावित अशी राजवाडा सेंट्रल पार्क करण्याचे नियोजन केले आहे. त्याचा आराखडा तयार केला आहे. त्याचबरोबर बहुमजली पार्किंग करण्यात येणार आहे. त्याकरता जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पशुसंवर्धन दवाखान्याच्या जागेचा अडसर ठरत आहे. त्याकरता जिल्हा परिषद प्रशासनाशी त्याबाबत चर्चा करुन ती जागा पालिकेकडे प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यानंतर पालिका त्या जागेवर पार्किंग व सेंट्रल पार्क तयार केले जाणार आहे. त्यामुळे त्या परिसरातील चार चाकी, दुचाकीचे पार्किंग त्या इमारतीत होणार आहे. शहरातील पार्किंगचा प्रश्न मिटणार आहे.
ऐतिहासिक राजवाडा तसेच सोमण सभागृहासमोर असणाऱ्या चौपाटीमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे सातारकरांनी येथील चौपाटी दुसरीकडे हलवावी अशी मागणी केली होती. ही चौपाटी अळुच्या खड्ड्यात हलवण्याचाही प्रयत्न झाला. परंतु व्यापाऱ्यांनी तिकडे जायला नकार दिल्यामुळे चौपाटी राजवाड्यासमोरच आहे. आता पालिकेने चौपाटीसह येथील पार्किंगची सोय व्हावी यासाठी सेंट्रल पार्क व बहुमजली पार्किंगचा प्रस्तावित आराखडा तयार केला आहे. लवकरच याला चालना मिळण्याची शक्यता आहे.