मुळगाववासीयांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार, कोणत्याही क्षणी खाण बंद करण्याचा इशारा, बैठक सुरू असतानाच दिली खाणीवर धडक
डिचोली : मुळगाव डिचोली येथे सुरु असलेल्या वेदान्त कंपनीच्या खाणकामाविरोधात मुळगाववासीयांनी पुन्हा एल्गार केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत खाणीविरोधात आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार मुळगाववासीयांनी केला असून कोणत्याही क्षणी खाणीवर धडक देऊन खाणकाम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. खाणीच्या विषयावर मुळगावातील श्री केळबाई देवीच्या मंदिरात ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. ही बैठक सुरु असतानाच मुळगाववासीयांनी वेदान्तच्या खाणीवर धडक दिली. मुळगाववासीयांनी गावाच्या हितार्थ वेदान्त कंपनीकडे 15 मागण्या सादर केलेल्या आहेत.
त्या मगण्यांवर संपूर्ण गाव ठाम असून त्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. रविवार 1 मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या या बैठकीस श्री केळबाई देवस्थान समितीचे अध्यक्ष कृष्णा परब, मुळगाव नागरिक कृती समितीचे अध्यक्ष वसंत गाड, कोमुनिदाद संस्थेचे अध्यक्ष महेश्वर परब, शेतकरी संघटनेचे प्रकाश परब, समाजकार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, पंच सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. बैठकीत खाणकामामुळे गावात होत असलेल्या दुष्परिणामांवर चर्चा करण्यात आली. धूळप्रदूषण, पाण्याचे स्रोत, शेती व पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वेदान्त कंपनीकडे मांडलेल्या विविध मागण्यांची तत्काळ पूर्तता व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेत खाणीवर धडक देण्याचे ठरविले. बैठकीतील सर्व सदस्य तसेच मोठ्या संख्येने महिला सहभागी होत खाणीच्या ठिकाणी गेले. खाण व्यवस्थापनाला याची पूर्वकल्पना असल्याने खाणीवरील कामकाज आधीच बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. उद्यापासून खाणीवर कोणतेही काम सुरु झाल्यास रात्री-अपरात्री कुठल्याही क्षणी मोठ्या संख्येने येऊन खाणकाम बंद करण्यात येईल, असा कडक इशारा ग्रामस्थांनी दिला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.