मुलबंध किंवा वज्रासन आणि जालंधरबंध
भगवंत म्हणाले, योगाभ्यासाला माणसाला समाधान वाटेल असे ठिकाण असावे. हे स्थान सुंदर आणि अतिशय पवित्र असल्याने येथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते. योगाभ्यासास सुरवात करण्यापूर्वी दर्भावर कृष्णाजीन घालून त्यावर बसावे आणि मन एकाग्र करून, सद्गुरुंचे स्मरण करावे. शरीर स्थिर ठेऊन, कोणतीही हालचाल न करता स्वत:च्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टि लावावी. ह्या अर्थाचा
शरीर सम-रेखेत राखावे स्थिर निश्चळ। दृष्टि ठेवूनि नासाग्री न पहावे कुणीकडे।।13।। हा श्लोक आपण पहात आहोत. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, आधी सांगितल्याप्रमाणे आसनावर बसल्यानंतर अनुभव येऊ लागतो. इच्छा आणि अपेक्षा संपलेल्या असल्याने स्वभाव निवळतो. समाधी आटोक्यात येते व बसताक्षणीच सर्व अभ्यास संपतो.
आता आसनमुद्रेबद्दल सांगतो. पोटऱ्याला चिकटून मांडी घालावी. दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधारचक्राखाली (गुदस्थानावर शिवणीपाशी) सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत. उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिने शिवण दाबावी, म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो. गुद व शिश्न यामध्ये जी चार बोटे जागा आहे त्यापैकी दीड बोट वर व दीड बोट खाली जागा सोडून मध्ये जी एक बोटभर जागा राहते तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या उत्तर भागाने आपले अंग तोलून घट्ट दाबावे. उचलला आहे की नाही हे कळे न कळे अशा तऱ्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावेत. अर्जुना, असे केले की, सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो. हे मूलबंधाचे लक्षण आहे असे समज व याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. याप्रमाणे आधारचक्रावर मूळबंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपानवायु आतल्याआत संकुचित होऊ लागतो. तेव्हा द्रोणाकार झालेली हस्तांजुळी सहजच डाव्या पावलावर बसून दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट राहते. डोळ्यांच्या पापण्या झाकल्या जातात. वरच्या पापण्यास काही ढाळ होऊन खालच्या पापण्या खाली पसरतात, तेव्हा अर्धी उघडी अशी त्या डोळ्यांची स्थिती होते. दृष्टी ही आतल्या आत डोळ्यातच राहते, जर कौतुकाने बाहेर आलीच तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावरच पडते. अशी आत वळलेली दृष्टी पुन्हा बाहेर येत नाही, म्हणून अर्ध्या दृष्टीचे राहणे नाकाच्या शेंड्यावरच होते. अशा परिस्थितीत चोहोकडे पाहण्याची इच्छा आपोआपच नाहीशी होते. मग गळा आकुंचित होऊन गळ्याखालच्या खळगीत हनुवटी अडकून बसते, ती तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते. त्यामध्ये कंठमणी म्हणजे गळ्याची घाटी अदृश्य होते. असा जो बंध पडतो त्याला जालंधरबंध असे म्हणतात. पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणाऱ्या योग्याने शांत अंत:करणाने, भीतीरहित होऊन, माझ्या ठिकाणी चित्त ठेवून, फक्त माझा विचार करत संयमी मनाने आसनावर बसावे.
शांत निर्भय मच्चित्त ब्रम्हचर्य-व्रती स्थिर । मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ।। 14 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, सद्गुरूंचे स्मरण करून झाल्यावर, चित्त व इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन करून योगाभ्यासास सुरवात करावी.