प्रश्नच प्रश्न चोहीकडे...गेला खासदार कुणीकडे..? मुकुंदराव देसाई यांचा सवाल
आजरा : प्रतिनिधी
आपल्या मतदार संघातील प्रश्न-समस्या सोडवण्यासाठी जनता खासदार निवडून त्यांना संसदेत पाठवते. या खासदारांनी निवडून गेल्यानंतर मतदारसंघातील गावांना भेटीगाठी देऊन समस्या जाणून घ्यायच्या असतात. पण गेल्या पाच वर्षात आमच्या लोकसभा मतदारसंघातील खासदार कधी संसदेत दिसला नाही आणि मतदारसंघातही फिरकला नाही. मग हा खासदार पाच वर्षे होता कुठे? असा सवाल आजरा तालुका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे मुकुंदराव देसाई यांनी केला. बिनकामाच्या या खासदाराला घरी बसवून कार्यक्षम व्यक्तिमत्त्व शाहू छत्रपती यांना विजयी करून संसदेत पाठवूया, असे आवाहनही त्यांनी केले.
शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी माजी खासदार संभाजीराजे व संयोगिताराजे यांनी हाती घेतलेल्या चंदगड व आजरा तालुक्यातील गावबैठकांमध्ये मुकुंदराव देसाई बोलत होते.
यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले, कष्टकर्यांचा आवाज दडपण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. सरकारची सामान्यांच्या विरोधातील धोरणे पाहून श्रमिक मुक्ती दलाने इंडिया आघाडीच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या निवडणुकीत शाहू छत्रपती हे प्रचंड मतांनी विजयी होणार असून मतदानाची केवळ औपचारिकता बाकी आहे.
सरोळी, निंगुडगे, पेद्रेवाडी, हत्तीवडे, बोलकेवाडी, मेंढोली, बुरुडे, भटवाडी, चांदेवाडी येथे गाव बैठका झाल्या. यावेळी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, विक्रम देसाई, राजू होलम, संतोष मासाळे, संजय सावंत हे संभाजीराजेंसोबत सहभागी झाले होते. दुपारच्या सत्रात सोहाळे, साळगाव, पेरणोली, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव असा दौरा झाला. यावेळी मुकुंद देसाई, उदय पवार, रणजित देसाई, रवी भाटले, शिवराज देसाई, राजू सावंत, एस. पी. कांबळे उपस्थित होते.