भारतीय डेव्हिस संघात मुकुंदचे पुनरागमन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
यजमान भारत आणि टोगो यांच्यात येथे शनिवारपासून सुरू होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या विश्वगट-1 प्ले ऑफ लढतीसाठी भारतीय डेव्हिस चषक संघामध्ये शशिकुमार मुकुंदचे पुनरागमन झाले आहे.
शशिकुमार मुकुंदने 2023 च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या डेव्हिस चषक लढतीमध्ये आपले पदार्पण केले होते. पण त्याच्या पदार्पणातीलच लढतीत वादग्रस्त घटना घडल्याने त्याने गेल्यावर्षी डेव्हिस चषक स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. मात्र आता तो टोगो विरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीत खेळणार असल्याचे सांगण्यात आले. शशिकुमार मुकुंदला ऑस्ट्रियामध्ये टेनिसचे मार्गदर्शन मिळत आहे. सुमित नागलच्या गैरहजेरीत भारतीय डेव्हिस चषक संघात मुकुंदचा समावेश करण्यात आला आहे. या लढतीत विजय मिळविणारा संघ डेव्हिस चषक विश्वगट 1 मध्ये दाखल होणार असून ही लढत चालुवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात खेळविली जाईल.
शनिवारी या लढतीतील पहिले दोन एकेरी सामने खेळविले जातील. शशिकुमार मुकुंद व टोगोचा अॅजेव्हॉन यांच्यात पहिला सामना होणार असून दुसरा एकेरी सामना रामकुमार रामनाथन आणि थॉमस सेटोजी यांच्यात होईल. रविवारी एन. श्रीराम बालाजी व बोलीपल्ली यांचा दुहेरीचा सामना टोगोच्या शेटोजी आणि पॅडिओ यांच्यात होईल. त्यानंतर शशिकुमार मुकुंद व थॉमस शेटोजी यांच्यात परतीचा एकेरी सामना त्याच प्रमाणे रामकुमार रामनाथन आणि अॅजेव्हॉन यांच्यात शेवटचा एकेरी सामना होणार आहे.