मुकुंद, रामकुमार रामनाथन विजयी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या 2025 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या विश्वगट-1 प्ले ऑफ लढतीमध्ये यजमान भारताने टोगोवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. सलामीच्या एकेरी सामन्यात भारताच्या शशिकुमार मुकुंद आणि रामकुमार रामनाथन यांनी शानदार विजय मिळवून आपल्या संघाला आघाडीवर नेले आहे.
शनिवारी येथील दिल्ली लॉन टेनिस संघटनेच्या संकुलातील टेनिस कोर्टवर झालेल्या पहिल्या एकेरी सामन्यात 28 वर्षीय शशिकुमार मुकुंदने टोगोच्या लीओव्हा अॅजेव्हॉनचा 6-2, 6-1 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या रामकुमार रामनाथनने केवळ 50 मिनिटांच्या कालावधीत टोगोच्या थॉमस सेटोजीवर 6-0, 6-2 अशी मात केली. भारताने सलामीचे दोन्ही एकेरी सामने जिंकल्याने या लढतीमध्ये आता त्यांचे पारडे जड आहे. पहिले दोन्ही एकेरी सामने एकतर्फी झाल्याने टेनिस शौकिन नाराज झाले. 2024 च्या हंगामातील डेव्हिस चषक स्पर्धेला मुकुंदला मुकावे लागले होते. आता रविवारी पुरुष दुहेरीचा सामना खेळविला जाईल. एन. श्रीराम बालाजी व ऋत्विक बोलीपल्ली हे भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.