Muharram 2025: अलविदा हो, अलविदा... भावपूर्ण वातावरणात पंजा विसर्जन
दहा दिवस भक्तिमय वातावरणातील मोहरमचीही सांगता झाली
कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा गजर, धुपाचा दरवळ, अबिराची अखंड उधळण आणि ‘अलविदा हो, अलविदा’ म्हणत रविवारी पंजांचे पंचगंगा नदीत विसर्जन करण्यात आले. पावसाने थोडी उघडीप दिल्याने पंजांचे दर्शन घेण्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती.
प्रेषित महंमद पैगंबरांचे नातू हसन-हुसेन यांनी करबलाच्या युद्धात दिलेल्या शहादतीच्या स्मृतिप्रित्यर्थ शहरातील तालीम संस्था व घरगुती सेवेकरींनी प्रतिष्ठापना केलेल्या पंजांचे रविवारी भावपूर्ण वातावरणात विसर्जन केले. दहा दिवस भक्तिमय वातावरणातील मोहरमचीही सांगता झाली.
सायंकाळी पाचच्या सुमारास तालीम संस्था व घरगुती सेवेकरींनी पंजांच्या विसर्जन मिरवणुका काढल्या. तुरळक पावसाच्या सरींमध्येही पी-ढबाक, पारंपरिक वाद्यांच्या साथीने काढलेल्या या मिरवणुकीत पावलो-पावली पंजांच्या नावाचा जयघोष करत अबिराची उधळण केली.
सामूहिकपणे नात सलाम, फातेह पठण कऊन सामाजिक ऐक्यासाठी दुवा पठण केली. यानंतर अलविदा यो अलविदा हे भावपूर्ण गीत म्हणत परतीचा मार्ग धरला. सायंकाळी पाचनंतर सर्व पंजे एकामागून एक याप्रमाणे बिंदू चौक, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महापालिका पापाची तिकटी, गंगावेशमार्गे तर काही पंजे बुधवार तालीम, तोरस्कर चौकमार्गे नदी घाटावर विसर्जनासाठी नेले जात होते.
त्यामुळे दोन्हीही रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी तत्काळ वाहतूक कोंडी दूर केली. पंजांना चिरमुरे, भेंड बत्ताशे, पेढे व खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला. यानंतर पंजांच्या जरी पटक्यांचे गाठोडे कऊन परतीचा मार्ग धरला. प्रतिष्ठापना केलेल्या जागी परत आल्यानंतर विसर्जनाचा विधी केलेल्या जरी पटक्यांचे गाठोडे ठेवले.
त्यांना चोंग्याचा नैवेद्य दाखवला. यानंतर भाविकांनीही पंजांना चोंग्याचा नैवेद्य अर्पण कऊन सुखसमाधानाची प्रार्थना केली. यामध्ये छत्रपतींचे पीरपंजे, चॉदसाहेब पंजा, बाबूजमाल पीरपंजे, उत्तरेश्वर पेठ, शिवमंदिर वाचनालय, संध्यामठ गल्ली, राजारामपुरी, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, शिवाजी पेठ, यादवनगर, सुभाषनगर परिसरांतील पंजांचा समावेश होता.
गडहिंग्लजला ताबूत विसर्जन
गडहिंग्लजला मुस्लिम बांधवानी सत्य आणि समर्पणेसाठी बलिदान देणाऱ्या इमामे हसन आणि हुसेन यांचे प्रतिक म्हणून साजरा करण्यात मोहरम सण पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी पंजे व नालसाबाची प्रतिष्ठपना केली होती.
शनिवारी रात्री खत्तल रात्री फोडण्याचा विधी पार पडल्यानंतर रविवारी ताबूत भेट व झेंडा भेटाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला. यावेळी बळी राजावर संकट येऊ नये, सुख समृध्दी यावी, सामाजिक सलोखा, राष्ट्रीय ऐक्य व शांतता रहावी यासाठी अमिर अली मुजावर यांनी प्रार्थना केली.
सायंकाळी सर्व पंजे व नालसाब यांची भेट होऊन रात्री उशिरापर्यंत सजविलेल्या ताबूत अबीरच्या उधळण आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात हिरण्यकेशी नदीघाटावर विसर्जित करण्यात आले. यावेळी अलविदा ओ अलविदा, शाहे शाहिदा अलविदा हे स्मृतीगीत, शोकगीते म्हणत परतले. यासाठी जैनूल मकानदार, आसिफ मकानदार, फिरोज खलीफ, सलीम खलीफ, समीर मुल्ला, महमंदअली मुल्ला, शहानवाज मुल्ला आदींनी परिश्रण घेतले.
कुरुंदवाडात भक्तिभावाने पीर-पंजाचे विसर्जन
कुरुंदवाड शहर व परिसरात पारंपरिक भक्तिभाव आणि धार्मिक सलोख्याच्या वातावरणात पीर-पंजाचे विसर्जन करण्यात आले. बाराईमाम, तक्का, कुडेखान नालसाहेब, नालसाब यांच्यासह शहरातील एकूण 22 पीरांच्या भेटी रविवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाविकांच्या अबीर उधळणीमध्ये पार पडल्या.
दर्शनानंतर पीर-पंजांना भाविकांच्या घरी नेण्यात आले आणि गुळाचा प्रसाद वाटून पूजन करण्यात आले. रात्री उशिरा मरगुबाई मंदिर, हलसिद्धनाथ मंदिर, पंत मंदिर आणि गोदड मशिदीत पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. दरम्यान, कुडेखान बडेनालसाहेब व नालसाब यांनी हजरत दौलतशाह वली दर्गा तसेच राजवाड्यातील गणपतीचे दर्शन घेऊन भेटींचा प्रारंभ केला.
शनिवारी रात्री ‘नववी खत्तल‘ ही नवस फेडण्याची मानाची रात्र असल्याने हिंदू-मुस्लिम बांधवांनी चोगे, मलिदा, रोठ व मोदकाचा नैवेद्य अर्पण करून नवस फेडले. काही मशिदींमध्ये उशिरापर्यंत खाई उधळण्याचा विधीही पार पडला. सोमवारी पहाटेपर्यंत विसर्जन सुरू होते.