मोहम्मद युनूसांचे सहकारी देश सोडण्याच्या तयारीत
कारवाईची भीती सतावत असल्याचा शक्यता
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात तारिक रहमान हे नवे पंतप्रधान झाले आहेत. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला बहुमत मिळाले आहे. याचदरम्यान आतापर्यंत अंतरिम सरकार चालविणारे मोहम्मद युनूस यांच्या अनेक निकटवर्तीयांनी देश सोडला आहे किंवा देश सोडण्याची तयारी चालविली असल्याचे समोर आले आहे. शेख हसीना यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत झालेल्या हिंसक आंदोलनानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले होते. मोहम्मद युनूस यांनी स्वत:चे अंतरिम सरकार प्रामाणिक असल्याचा दावा केला होता, मग या प्रामाणिक सरकारचे सल्लागार देश सोडून का जात आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय.
मोहम्मद युनूस यांचे निकटवर्तीय अन् अंतरिम सरकारचे सल्लागार फैज अहमद तैयब हे निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी जर्मनीत पोहोचले आहेत. तैयब हे आतापर्यंत मोहम्मद युनूस यांना इंटरनॅशनल क्राइम ट्रिब्युनल आणि दूरसंचार प्रकरणी मदत करत होते. युनूस यांचे निकटवर्तीय हे मागील 3 महिन्यांपासून बांगलादेशातून पळ काढण्याची तयारी करत असल्याचा दावा करण्यात आले आहे.
युनूस यांचे सल्लागार देशातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असून याप्रकरणी चौकशी केली जावी. अनेक सल्लागार सुरक्षित एक्झिटच्या शोधात आहेत. सुरक्षित एक्झिटपूर्वी कमीतकमी स्वत:च्या संपत्तींचा पूर्ण तपशील द्यावा असे आवाहन आम्ही या सल्लागारांना करत आहोत. स्वत:च्या कार्यकाळात या सल्लागारांनी देशासाठी काय केले हे समोर येणे आवश्यक आहे असे उद्गार एनसीपीचे नेते नसीरुद्दीन पटवारी यांनी काढले आहेत. बांगलादेशच्या राजकारणात आता युनूस यांच्या निकटवर्तीयांचा देश सोडण्याचा मुद्दा चर्चेत आहे.