लंडनमध्ये एमबीएसाठी गेली, कुटुंबाला न सांगताच भारतात परतली; जाणून घ्या पुण्यातील फ्लॅटमध्ये मृतदेह सापडलेल्या मुग्धा देशमुख प्रकरणाची सविस्तर माहिती
मुग्धा ही छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून तिचे वडील अविनाश देशमुख शासकीय सेवेतून शहर अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत. मुग्धाने पुण्यातील सीओईपी महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर एका बँकेत नोकरी केल्यानंतर एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी ती जुलै २०२५ मध्ये लंडनला गेली होती. तेथील शिक्षणासोबतच पार्टटाइम नोकरी करत असल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितले होते. ती नियमितपणे आई-वडिलांशी फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होती.
२३ ऑक्टोबरला शेवटचा संपर्क
२३ ऑक्टोबर रोजी मुग्धाचे आईशी फोनवर बोलणे झाले होते. नोकरीच्या मुलाखतीसाठी घाई असल्याचे सांगून तिने फोन ठेवला. त्यानंतर मात्र तिचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आई-वडील चिंतेत पडले. तिचा फोनही बंद झाल्याने कुटुंबीयांनी लंडनमधील तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधला.
मुग्धा बेपत्ता असल्याची तक्रार लंडन पोलिसांकडे करण्यात आली. तपासादरम्यान २६ ऑक्टोबर रोजी लंडन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच लंडन सोडले होते. ही बाब समजल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तिने भारतात परतल्याची माहिती का दिली नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.
बँक खात्यातील व्यवहारांमुळे मिळाला धागा
मुग्धाचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी तिच्या बँक खात्याची माहिती तपासली. त्यावेळी भारतात असताना तिच्या खात्यावरून विविध ऑनलाइन माध्यमांद्वारे खाद्यपदार्थ मागवण्यात आल्याचे व्यवहार समोर आले. यावरून ती भारतात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ती नेमकी कुठे आहे, याचा शोध घेणे आवश्यक होते.
त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मुग्धाच्या पालकांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे धाव घेत तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्यातून मुग्धाचे लोकेशन पुण्याजवळील गहुंजे येथील लोढा सोसायटीत असल्याचे निष्पन्न झाले.
बंद फ्लॅट उघडताच मृतदेह आढळला
छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे पथक आई-वडिलांसह गहुंजे येथे पोहोचले. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव पोलिसांनाही माहिती देण्यात आली. २८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता पोलिसांनी संबंधित फ्लॅटची तपासणी केली. फ्लॅट बंद असल्याने चावी तयार करणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. आत प्रवेश केल्यानंतर मुग्धाचा मृतदेह बेडवर कुजलेल्या अवस्थेत आढळला.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
मुग्धाने एप्रिल २०२६ मध्ये हा फ्लॅट भाड्याने घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ती तेथे एकटीच राहत होती. सोसायटीतील सुरक्षा व्यवस्था, शेजारी आणि तिच्या संपर्कातील व्यक्तींबाबत पोलिसांनी चौकशी केली. प्राथमिक तपासात घरातून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
शवविच्छेदनादरम्यान शरीरावर बाह्य जखमांच्या खुणा आढळल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याची शक्यताही तपासली जात असल्याचे वृत्त आहे. व्हिसेरा अहवाल आणि पुढील तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
लंडनमधील शिक्षण सोडून मुग्धा अचानक भारतात का परतली? तिने कुटुंबीयांपासून ही बाब का लपवली? तसेच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
