फुलबाग गल्ली येथील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
बेळगाव : फुलबाग गल्ली येथील रस्त्याच्या कामासाठी खोदाई करण्यात आली असून, मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल पसरला आहे. या चिखलातूनच वाट काढत नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होत असल्याने रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. फोर्ट रोड येथील देशपांडे पेट्रोलपंपापासून तानाजी गल्ली रेल्वेगेटपर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. फोर्ट रोड येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणानंतर आता या कामाला सुरुवात करण्यात आली.
आठवडाभरापूर्वी जुन्या रस्त्यावर खोदाई करून भराव काढण्यात आला होता. यानंतर खडी घालून पुन्हा डांबरीकरण करण्यात येणार आहे. मागील दोन दिवसांत बेळगाव शहरासह परिसराला पावसाने झोडपले. याचा परिणाम या परिसरातही दिसून आला. या भागात दुचाकी व चारचाकी वाहनांचे सुटेभाग, तसेच ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित दुकाने असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाहनांची ये-जा असल्यामुळे पावसाच्या पाण्याने सर्वत्र चिखल झाला आहे. याचा फटका अनेक लहान व्यापाऱ्यांना बसला असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.