बंकी-बसरीकट्टी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
बेकवाड ग्रा. पं. चे साफ दुर्लक्ष, नागरिकांतून संताप
खानापूर : गांधी ग्रामने पुरस्कृत असलेल्या बेकवाड ग्राम पंचायतीचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने बेकवाड ग्राम पंचायत हद्दीतील बंकी-बसरीकट्टी या गावांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. बंकी, बसरीकट्टी गावच्या वेशीत संपूर्ण रस्ता या पावसात चिखलमय झाल्याने विद्यार्थी वर्गाला व वयोवृद्ध नागरिकांना चालत जाणेही कठीण झाले आहे. दुरुस्ती करून बंकी, बसरीकट्टी येथील रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. दोनवेळा गांधीग्राम पुरस्कृत असलेल्या बेकवाड ग्राम पंचायतीला नागरी सुविधा पुरवणे कठीण झाले आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या काळात गावकऱ्यांना रस्त्यावरील झालेल्या चिखलामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते हणमंत नाईक यांनी स्वत: रस्त्यावरील पाणी काढून चिखल हटवण्याचे काम केले होते. त्यामुळे थोडीफार सोय झाली होती. बंकी, बसरीकट्टीपासून रुद्रस्वामी मठापर्यंत रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्याचबरोबर बेकवाड-बंकी-बसरीकट्टी हा रस्ता देखील अत्यंत खराब झाल्यामुळे हाही रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.