होलसेल फूलमार्केटमध्ये चिखलाचे साम्राज्य
नागरिकांची गैरसोय, खरेदी-विक्रीलाही फटका
बेळगाव : बेळगावमधील होलसेल फुलांच्या मार्केटमध्ये सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे दलदल पसरली असून नागरिकांना फुले खरेदी तसेच लिलाव करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चिखलातूनच वाट काढत ये-जा करावी लागल्याने नाराजीचा सूर उमटत होता. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारकडून बेळगावमधील फूलविक्रेत्यांना होलसेल मार्केट अशोकनगर येथे उपलब्ध करून देण्यात आले. स्वतंत्र दुकानगाळे झाल्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार करणेही सोपे झाले. सणांच्या वेळी लाखो रुपयांची उलाढाल या मार्केटमधून होत असते. येथून महाराष्ट्र, कोकणासह कर्नाटकाच्या अधिकतर भागात फुलांचा पुरवठा केला जातो. परंतु, येथे असलेल्या गैरसोयींमुळे नागरिकांना फटका बसत आहे.
खंडेनवमी व विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. मार्केटच्या आतील भागात अद्याप काँक्रिट घालण्यात न आल्याने वाहनांची ये-जा सुरू असल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तब्बल फूटभर चिखल असल्यामुळे पायी ये-जा करणे अवघड जात होते. त्यामुळे फुलांचे लिलाव तसेच विक्री करायची कशी? असा प्रश्न विक्रेत्यांना पडला होता. सरकारने सुंदररीत्या फूलमार्केटचे बांधकाम केले असल्याने आतील भागाचे काँक्रिटीकरण केल्यास चिखलापासून कायमची सुटका होणार आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार करणे सोयीचे होणार आहे. राज्य सरकारने तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.