For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमटीडीसी रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक; बनावट वेबसाईटद्वारे आर्थिक गंडा; सायबर कक्षाकडे तक्रार दाखल

11:50 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
एमटीडीसी रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक  बनावट वेबसाईटद्वारे आर्थिक गंडा  सायबर कक्षाकडे तक्रार दाखल
Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली बनावट वेबसाईट तयार करून पर्यटकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी रिसॉर्टचे आरक्षण करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन एमटीडीसीचे कोकण विभागीय प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी केले आहे.

Advertisement

एमटीडीसीच्या रिसॉर्टचे आरक्षण केवळ mtdc.co या अधिकृत वेबसाईटवरून किंवा एमटीडीसीच्या अधिकृत माहिती व आरक्षण कक्षामार्फतच करावे. अनोळखी अथवा संशयास्पद वेबसाईटवरून बुकिंग करून कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यटकांची फसवणूक करणारी बनावट वेबसाईट बंद करण्यासाठी तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशाने एमटीडीसीकडून सायबर कक्षाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांनी बुकिंगपूर्वी वेबसाईटची अधिकृतता तपासावी आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवरून व्यवहार टाळावा, असे एमटीडीसीने स्पष्ट केले आहे.

Advertisement

बुकिंग करताना अडचण आल्यास किंवा संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यास पर्यटकांनी एमटीडीसीच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधावा. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील एमटीडीसी प्रादेशिक कार्यालय तसेच सिंधुदुर्गातील ओरोस फाटा येथील प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन दीपक माने यांनी केले आहे.

पर्यटकांनी रिसॉर्टचे आरक्षण केवळ अधिकृत माध्यमातूनच करून आर्थिक फसवणूक टाळावी, असे एमटीडीसीकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.