एसटी कर्मचाऱ्यांना 10 हजारांचा दिवाळी बोनस; संप मागे घेण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. या बैठकीत दिवाळी बोनसच्या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अडचणीची असतानाही कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी. दिवाळीनंतर पुन्हा बैठक घेऊन त्यांच्या उर्वरित मागण्यांवर चर्चा करण्यात येईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
संपाचे हत्यार वारंवार वापरू नका
एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना शक्य तितके लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही अधिकाधिक मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. महामंडळाची आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वारंवार संपासारख्या पर्यायाचा वापर करणे योग्य नाही. संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. कर्मचाऱ्यांनी हा विचार करून संपाचा मार्ग टाळावा, अशी विनंती त्यांनी केली.
खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट; आरटीओला कारवाईचे निर्देश
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा काही खासगी वाहनचालक घेत असल्याचेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. संपाच्या काळात प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारून त्यांची लूट करण्याचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना आरटीओला देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी कारवाई सुरू असून, प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर दिवाळीनंतर चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन सरकारने दिले असून, 10 हजार रुपयांच्या बोनस घोषणेनंतर कर्मचारी संप मागे घेणार का, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
