For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासगी आराम बससेवेला एसटीची टक्कर; ताफ्यात येणार 200 व्होल्वो बसेस; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

05:40 PM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
खासगी आराम बससेवेला एसटीची टक्कर  ताफ्यात येणार 200 व्होल्वो बसेस  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Advertisement

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासी सेवेत विस्तार करण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 200 अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Advertisement

या नव्या ताफ्यात 170 आसनी आरामदायी बसेस आणि 30 शयनयान बसेस असणार आहेत. सुरक्षितता, आरामदायी आसनव्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल सुविधांवर या सेवेत भर देण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

दिवसा आरामदायी, रात्री शयनयान प्रवास

250 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी 45 आसनी बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. रात्रीच्या प्रवासासाठी 30 किंवा 45 शयनयान क्षमतेच्या बसेसचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या वेळेनुसार आणि गरजेनुसार पर्याय मिळणार आहेत.

Advertisement

मोबाईलवरून तिकीट आरक्षण

नव्या आराम बससेवेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल आरक्षण व्यवस्था. प्रवाशांना मोबाईलच्या माध्यमातून एसटीच्या ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही तिकीट बुक करता येणार आहे. बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य प्रवासासाठी मागणी असलेल्या मार्गांवर या नव्या बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी सुविधा आणि डिजिटल आरक्षणाच्या माध्यमातून एसटीची लांब पल्ल्याची सेवा अधिक आधुनिक करण्याचा प्रयत्न असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.