‘एमएसएमईं’ना 40 लाख कोटींहून अधिकची कर्ज प्राप्ती
एका वर्षात 20 टक्क्यांची झाली वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला एकूण कर्ज आता 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. ही माहिती सीआरआयएफ हाय मार्कच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. अहवालानुसार, मार्च 2025 पर्यंत एमएसएमईंना दिले जाणारे एकूण कर्ज गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बँकांनी प्राधान्य क्षेत्रांसाठी कर्ज धोरणे मजबूत केली आहेत आणि सरकारने एमएसएमईसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. याशिवाय, व्यवसायातील डिजिटायझेशनमध्ये वाढ झाल्यामुळे कर्ज मिळवणे देखील सोपे झाले आहे.
कर्जाच्या मागणीत थोडीशी घट
तथापि, चालू कर्ज खात्यांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2025 मध्ये सक्रिय कर्जांची संख्या 2.14 कोटींवर घसरली आहे, जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 1.3 टक्क्यांनी कमी आहे. तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुमारे 24 टक्के वाढ नोंदवली गेली.