‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पहायला मिळत आहेत. तर कौटुंबिक चित्रपटांची संख्याही वाढताना दिसतेय. आई-लेक, सासू-सून, बाप-लेक अशा नात्यांवर अनेक चित्रपट मागील काही वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता नव्या चित्रपटात दोन भावांची गोष्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘बंधू’ आहे. जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये आता ‘बंधू’ या आगामी चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत. दोन भावांमधील अतूट प्रेम, नात्यांतील संघर्ष आणि काळाच्या ओघात नात्यांची लागणारी कसोटी यांची भावनिक कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे. ‘राम आहे म्हटल्यावर लक्ष्मण तर येणारच’ या टॅगलाइनमधूनच चित्रपटातील बंधुभावाचं महत्त्व अधोरेखित होतं. चित्रपटाचे पोस्टरही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये या दोघांची जोडी प्रथमच अशा मध्यवती भूमिकांमध्ये पहायला मिळणार असल्याने चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात मृण्यम देशपांडे, मिताली जगताप, स्मिता तांबे यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती हिंदी अभिनेता रजत बेदीने केली आहे. तर हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा अन् दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन सुपेकर यांनी पेलली आहे. विजय गवंडे यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातून नात्यांची भावनिक ताकद आणि भावांमधील निस्सीम प्रेम मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
