मृणाल हेब्बाळकर, प्रियांका जारकीहोळी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर : कारवारमधून डॉ. अंजली निंबाळकर
बेंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस हायकमांडने बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मृणाल हेब्बाळकर आणि चिकोडी मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्बत केले आहे. त्याचप्रमाणे कारवार मतदारसंघातून माजी आमदार अंजली निंबाळकर यांना तिकीट जाहीर केले आहे. गुरुवारी रात्री काँग्रेसने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. त्यात कर्नाटकातील 17 मतदारसंघांसह एकूण 57 मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राज्यातील 7 मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले. आता दुसऱ्या यादीत 17 उमेदवार जाहीर झाल्याने 24 मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. अद्याप चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, बळ्ळारी व कोलार या मतदारसंघातील उमेदवार निवडीविषयी पेच असून त्यावर गुरुवारी बेंगळूरमधील काँग्रेस कार्यालयात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. दोन-तीन दिवसांत येथील उमेदवार निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये एकाही मंत्र्याचा समावेश नाही. लोकसभा निवडणुकीत अधिक जागा जिंकण्यासाठी काँग्रेस हायकमांडने किमान 10 मंत्र्यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा विचार केला होता. मात्र, सर्वच मंत्र्यांकडून नकार येत असल्याने पर्यायी उमेदवार निश्चित करण्यात आले. अनेकांनी कुटुंबातील सदस्यांनाच निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
बेळगाव, कारवारमधील लढतींविषयी कुतूहल
खानापूर तालुक्याचा समावेश असणाऱ्या कारवार लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार अंजली निंबाळकर यांचे नाव आघाडीवर होते. त्यानुसार त्यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदासंघासह बेळगाव मतदारसंघातील उमेदवार भाजपने अद्याप जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे येथील लढतींविषयी जनतेत प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे.
मंत्र्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला...
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत पाच मंत्र्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, सतीश जारकीहोळी यांची मुलगी प्रियांका जारकीहोळी, ईश्वर खंड्रे यांचे पुत्र सागर खंड्रे, रामलिंगारे•ाr यांची मुलगी सौम्या रे•ाr, शिवानंद पाटील यांची मुलगी संयुक्ता पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्या पत्नी प्रभा मल्लिकार्जुन, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोडमनी यांना कलबुर्गी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मंत्र्यांची प्रतिष्ठाच पणाला लागणार आहे.
सर्वाधिक युवा, महिलांना संधी
आपल्या 40 वर्षांच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक युवा, महिला, सुशिक्षित, नव्या चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. मंत्र्यांच्या मुलांप्रमाणे पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही तिकीट दिले आहे. ज्यांनी मागितले त्यांना तिकीट दिले आहे.
- डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री
काँग्रेसचे दुसऱ्या यादीतील उमेदवार
- बेळगाव मृणाल हेब्बाळकर
- चिकोडी प्रियांका जारकीहोळी
- कारवार अंजली निंबाळकर
- बागलकोट संयुक्ता पाटील
- धारवाड विनोद असुटी
- कलबुर्गी राधाकृष्ण दोडमनी
- बिदर सागर खंड्रे
- कोप्पळ राजशेखर हिटनाळ
- मंगळूर पद्मराज
- उडुपी-चिक्कमंगळूर जयप्रकाश हेगडे
- चित्रदुर्ग बी. एम. चंद्रप्पा
- दावणगेरे डॉ. प्रभा मल्लिकार्जुन
- बेंगळूर दक्षिण सौम्या रे•ाr
- बेंगळूर सेंट्रल मन्सूर अली खान
- बेंगळूर उत्तर एम. व्ही. राजीव गौडा
- म्हैसूर एम. लक्ष्मण
- रायचूर जी. कुमार नायक