For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावर शस्त्राने हल्ला

12:02 PM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावर शस्त्राने हल्ला
Advertisement

क्लब रोडवरील घटना : खाण व्यवसायातील भागीदारांकडूनच हल्ल्याचा संशय

Advertisement

बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावर दोघांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवार दि. 6 रोजी दुपारी 1.15 च्या सुमारास क्लब रोडवरील हर्षा शोरुमसमोर घडली आहे. बसवंत गणपती कडोलकर (वय 33) रा. गावडे गल्ली, बेळगुंदी असे जखमीचे नाव असून याप्रकरणी शिवय्या उर्फ शिवा संगय्या पुजारी, मितेश शंकर बडिगेर दोघेही रा. गोजगा, मोनाप्पा दयानंद पाटील, संपत यल्लाप्पा कडोलकर दोघेही रा. बेळगुंदी या चौघांविरोधात  कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदा खाण व्यवसायातून हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी मदन रामलिंग भडांगे (वय 29) रा. भडांगे कॉलनी बेळगुंदी यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, जखमी बसवंत हा मृणाल हेब्बाळकर यांच्या कारवर चालक म्हणून गेल्या काही वर्षांपासून काम करीत होता. मंगळवारी दुपारी तो क्लब रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण पार्सल घेऊन जाण्यासाठी म्हणून फॉर्च्युनर कारगाडी घेऊन आला होता.त्यावेळी तो रस्त्याच्या कडेला कारगाडीजवळ थांबला असताना आरोपी शिवय्या आणि मितेश हे दोघेजण त्याच्यावर पाळत ठेवत क्लब रोडवर आले. त्या ठिकाणी दोघांनी त्याच्याशी भांडण काढत धारधार शस्त्राने छातीवर, दंडावर तसेच मांडीवर सपासप वार केले.

Advertisement

बसवंत गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ होऊन खाली कोसळताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. नेहमी वर्दळीच्या असलेल्या क्लब रोडवर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. याचवेळी सदर मार्गावरून नागरी हक्क संचालनालयाचे जिल्हा पोलीस प्रमुख रविंद्र गडादी हे आपल्या कार्यालयातून जेवणासाठी म्हणून घराकडे निघाले होते. त्यांच्या निदर्शनास सदर प्रकार येताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. ही माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, खडेबाजारचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखराप्पा एच. व कॅम्पच्या पोलीस निरीक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील बसवंतला आयोध्यानगर येथील एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले.

काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समजताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनींही वार्तांकनासाठी गर्दी केली. ज्यावेळी बसवंतला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होण्यासह रक्तदाब कमी झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचे विविध रिपोर्ट तपासण्यासह स्कॅनिंग केले. त्याच्या शरीरावर विविध ठिकाणी वर्मी वार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला कोणी त्याच्यावर हल्ला केला हे समजणे कठीण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पाहिले असता त्यामध्ये हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांची छबी कैद झाली होती.

तसेच जखमी बसवंत याचा मित्र मदन याने दिलेल्या चौघांजणांविरोधात फिर्याद दिल्याने हल्लेखोरांची नावे समोर आली. आरोपी मोनाप्पा आणि संपत यांनी दिलेल्या चितावणीवरून शिवय्या आणि मितेशने बसवंतवर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. चाकू किंवा तत्सम धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आला असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. आपल्या कारचालकावर हल्ला झाल्याचे समजताच काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी इस्पितळाला भेट देऊन बसवंतच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनीही हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेतली. मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटल परिसरात बंदोबस्त ठेवला होता. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व बसवंतच्या हितचिंतकांनी हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती.

अँटीस्टॅबिंग पथक आहे कोठे?

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरात सातत्याने तलवार तसेच चाकूहल्ल्यासारखे प्रकार घडत असल्याने अँटीस्टॅबिंग स्कॉड पथकांची स्थापना केली आहे. तरीदेखील वारंवार तलवार व चाकूहल्ल्याचे प्रकार घडत आहेत. दोन दिवसापूर्वी मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ल्याची घटना घडली असतानाच क्लब रोडवर दिवसाढवळ्या प्राणघातक शस्त्रांनी तरुणांवर हल्ला करण्यात आल्याने पोलीस आयुक्तांचे अँटीस्टॅबिंग पथक आहे कोठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बेकायदा खाण व्यवसाय...

जखमी बसवंत आणि आरोपी सर्वजण मिळून बेळगावसह खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये बेकायदेशीररित्या खाण व्यवसाय करीत होते. या बेकायदा व्यवसायावरून त्यांच्या गॉडफादरने काही दिवस व्यवसाय बंद ठेवण्याची सूचना केली होती. तरीदेखील बसवंतने रात्रीच्यावेळी आपला बेकायदेशीररित्या खाण व्यवसाय सुरु ठेवला होता. याच कारणातून रागाच्या भरात वरील आरोपींनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची चर्चा आहे. सध्या बेळगाव व खानापूर तालुक्यात राजरोसपणे बेकायदा खाण व्यवसाय सुरु आहे. मात्र त्याकडे जिल्हा प्रशासन, खाण व भूगर्भ खाते तसेच पोलीस खात्याने दुर्लक्ष केले असल्यानेच खाण माफियांना मोकळे रान मिळाले आहे. त्याचबरोबर याच कारणावरून माफियायुद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर अधिकाऱ्यांनी वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.