For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शक्तिप्रदर्शनाने मृणाल हेब्बाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

11:22 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
शक्तिप्रदर्शनाने मृणाल हेब्बाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल
Advertisement

हजारो कार्यकर्त्यांचा शक्तिप्रदर्शनात सहभाग : राज्यातील दिग्गज नेत्यांचीही उपस्थिती : सीपीएड् मैदानावर लक्षवेधी वाद्यांचा गजर 

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे अर्ज दाखल करताना   उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार चन्नराज हट्टीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार प्रकाश हुक्केरी आदी मान्यवर उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शनात सहभाग घेतला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी गोपूजा करून घरामध्ये अनेक मठाधिशांची पादपूजा करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर हिंडलगा येथील गणेश मंदिरात पूजा करून सुळेभावी महालक्ष्मी देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर सीपीएड् मैदानावरून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली.

महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Advertisement

सीपीएड् मैदान ते चन्नम्मा चौकापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. हातामध्ये भगवा, पिवळा, निळा, तसेच काँग्रेस पक्षाचा ध्वज धरून सहभागी झाले होते. डोक्यावर काँग्रेस पक्षाची टोपी धारण करून शेकडो महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. लक्षवेधी ढोलपथकांनी सहभाग घेतला होता. ढोलपथक, धनगर ढोल यासह मंगळूर येथील चेंडे ढोलपथक सहभागी झाले होते.  सीपीएड् मैदानावर या वाद्यांच्या गजरात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या घोषणा देऊन साथ दर्शविली. चन्नम्मा चौकामध्ये याची सांगता करण्यात आली. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उमेदवार मृणाल हेब्बाळकर 2 लाखांपेक्षा अधिक अंतराने जिंकण्याची अपेक्षा व्यक्त केली. या शक्तिप्रदर्शनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानून अशीच साथ देऊन निवडून देण्याचे आवाहन केले. शक्तिप्रदर्शनादरम्यान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार प्रकाश हुक्केरी, अशोक पट्टण, महांतेश कौजलगी, विश्वनाथ वैद्य, गणेश हुक्केरी, बाबासाहेब पाटील, राजू कागे, महाराष्ट्राचे आमदार धीरज देशमुख आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.