सेवा रुग्णालयात लवकरच एमआरआय, सीटी स्कॅनची सुविधा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, हृदयरोग विभागही होणार कार्यान्वयित
कोल्हापूर : कसबा बावडा, लाईन बाजार येथील ऐतिहासिक सेवा रुग्णालयात आता लवकरच एमआरआय, सीटीस्कॅन, कॅथलॅबसह अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून, या सुविधांचे लवकरच लोकार्पण होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. त्याचबरोबर याठिकाणी टप्याटप्याने २०० खाटांचे सुसज्य हॉस्पिटल उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे सेवा रूग्णालयात तत्काळ निदान व वेळेत उपचार मिळणार असल्याने सर्वसामान्यांना माफक दरात याचा लाभ होणार आहे.
मंत्री आबिटकर म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पायाभरणी केलेल्या या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे नवे पर्व सुरू होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना खासगी व कॉर्पोरेट रुग्णालयांच्या धर्तीवर दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा शासकीय यंत्रणेतून उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, निदान सुविधा, उपचार व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सेवा रुग्णालयाचे टप्याटप्याने अत्याधुनिकीकरण करण्यात येत आहे.
एमआरआय सुविधा सुरू झाल्यानंतर विविध आजारांचे अधिक अचूक निदान करणे शक्य होणार आहे. सीटीस्कॅन सुविधेमुळे कर्करोग, गाठी विविध गंभीर आजारांचे निदान जलद होणार आहे. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी कॅथलॅब ही महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. एंजिओग्राफीसह हृदयविकाराच्या निदान, उपचारासाठी आवश्यक सुविधा येथे उपलब्ध होणार असल्याने गंभीर रुग्णांना उपचारासाठी अन्यत्र हलविण्याची गरज भासणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विविध चाचण्या एकाच ठिकाणी
अत्याधुनिक आयपीएल लॅब सुरू करण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास त्यामुळे मदत होणार असून, संसर्गजन्य आणि साथीच्या आजारांचे तातडीने निदान करण्याबरोबरच त्यांच्या नियंत्रणासाठीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
२०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय करण्याचा मानस
सेवा रुग्णालयाचे टप्याटप्याने २०० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयात रूपांतर करण्याचा मानस आहे. यासाठी पायाभूत सुविधा, उपचार व्यवस्था सक्षम करण्यात येणार आहे, भविष्यात आधुनिक शासकीय आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र म्हणून नवी ओळख निर्माण होणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
अतिदक्षता विभागासाठी ५० खाटांची स्वतंत्र इमारत
सेवा रुग्णालयात ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाची स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार आहे. गंभीर रुग्णांना तातडीने उपचार, निदान सुविधांबरोबरच अतिदक्षता उपचाराची क्षमता उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा विभाग महत्त्वाचा ठरणार आहे.