For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जिल्हाधिकारी महोदय... ३०० नव्हे ३० हजार

08:02 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिल्हाधिकारी महोदय    ३०० नव्हे ३० हजार
Advertisement

मराठी भाषिकांचे काळ्यादिनाच्या फेरीतून प्रत्युत्तर : हजारोंच्या संख्येने सहभाग, तरुणाईच्या हाती लढ्याचे नेतृत्व

Advertisement

कन्नडडिगांना खुश करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना डिवचले होते. काळ्यादिनाच्या सायकल फेरीमध्ये केवळ 300 जणच सहभागी होतात, असे म्हणत त्यांनी सीमाप्रश्नासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांचाही अवमान केला होता. मराठी भाषा आणि संस्कृतीवर वार झाला की तरुणाई कशी रस्त्यावर उतरते, हे पुन्हा एकदा दिसून आले. 300 नव्हे तर 30 हजारांहून अधिक सीमाबांधव रस्त्यावर उतरले होते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यामुळे मराठी भाषेवर घाला घालण्याचा प्रयत्न झाल्यास असेच प्रत्युत्तर मिळेल, हेच आज प्रशासनाने ध्यानात घ्यायला हवे.

  त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : भाषावार प्रांतरचनेनंतर बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाषिक भूभाग तत्कालिन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आला आणि मराठी भाषिकांचा सीमाप्रश्नाचा लढा उभा राहिला. आज 70 वर्षे उलटली तरी अद्याप सीमावासियांना न्याय मिळालेला नाही. परंतु आजही मराठी भाषिकांमध्ये तोच जोश, तीच धग दिसून येते. तरुणाई सीमालढ्यापासून दूर गेली हे वारंवार सांगितले जात होते. परंतु जेव्हा मराठी भाषेवर आघात होतो तेव्हा हाच तरुण पेटून मराठी भाषेच्या रक्षणासाठी रणांगणात येतो, हे रविवारच्या काळ्यादिनाच्या फेरीतून दिसून आले.

सकाळी ठीक 9.15 वाजता ध. संभाजी उद्यानातून निषेध फेरीला सुरुवात झाली. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. सुरुवातीला कार्यकर्त्यांची संख्या मर्यादित होती. त्यानंतर हळूहळू युवा वर्गाची संख्या वाढत गेली. कपिलेश्वर उ•ाणपूल परिसरात हजारोंच्या संख्येने तरुणाई सहभागी झाली. काळे कपडे, काळे ध्वज, काळ्या टोप्या, दंडाला काळ्या फीत बांधून सहभागी झालेल्यांची संख्या अधिक होती.

कार्यकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ

एसपीएम रोडपासून कार्यकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. शेतीची कामे असतानाही ग्रामीण भागातील तरुणांसह वयोवृद्ध कार्यकर्तेही सहभागी झाले होते. महाद्वार रोड, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, शिवाजी रोड, शेरी गल्ली कॉर्नर, हेमू कलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर उ•ाणपूल, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, बसवाण गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया कॉर्नर, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कलमार्गे मराठा मंदिर येथे सांगता झाली.

फेरीचे नेतृत्व युवकांच्या हाती

यावर्षी युवा वर्गाची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. सायकल फेरीच्या सुरुवातीला लहान मुलांनी हातात फलक घेऊन सीमाप्रश्नासाठी चौथी पिढी सज्ज असल्याचे दाखवून दिले. त्यापाठोपाठ महिलांनीही आपले अस्तित्व दाखवून दिले. परंतु यावर्षी लक्षवेधी ठरली ती युवा वर्गाची संख्या. मागील तीन-चार वर्षांपेक्षाही अधिक युवा वर्ग या फेरीमध्ये दिसून आला. त्यामुळे फेरीचे नेतृत्वही युवकांच्या हाती आले होते.

जेन झी फलक ठरले लक्षवेधी

दिल्ली येथे झालेल्या जेन झी आंदोलनाच्या धर्तीवर बेळगावमध्ये काळ्यादिनासाठी लक्षवेधी फलक तयार करण्यात आले होते. लहान मुलांसह युवकांनी हे 100 हून अधिक फलक हाती घेतले होते. संपूर्ण फेरीमध्ये या फलकांचीच अधिक चर्चा झाली. मराठी माणूस संपला, असं वाटतं? बघा, आम्ही आलोय. ओ काका, मोजला काय? 350 हून जास्त आहेत. मराठीला दाबणे, नॉट कुल, टॉक्सिक आहे. आम्ही भूमीपुत्र, तुम्ही पाहुणे. असे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

बिदर येथील कार्यकर्त्यांची उपस्थिती

काळ्यादिनाच्या फेरीमध्ये केवळ बेळगावच नाही तर बिदर, भालकी येथूनही मराठी भाषिक सहभागी झाले होते. बेळगाव इतकीच बिदर येथेही सीमाप्रश्नाची धग आहे. तेथील युवा कार्यकर्ते दिनेश मुधाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते बेळगावमध्ये दाखल झाले होते. आजही बिदरमधील लोकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा कायम आहे, हे त्यांनी आपल्या उपस्थितीतून दाखवून दिले.

फेरीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, नेताजी जाधव, रणजित चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, अॅड. एम. जी. पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. अमर येळ्ळूरकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, किरण गावडे, माजी नगरसेवक पंढरी परब, राजू बिर्जे, विजय भोसले, प्रकाश शिरोळकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, विनायक गुंजटकर, मनोहर हलगेकर, अप्पासाहेब पुजारी, वैशाली हुलजी, मदन बामणे, गणेश द•ाrकर, अमित देसाई, सुनील बोकडे, राजू किणयेकर, लक्ष्मण होनगेकर, सतीश पाटील, राजू पावले, वामन पाटील, प्रकाश अष्टेकर, दुदाप्पा बागेवाडी, दयानंद उघाडे, प्रकाश मालुचे, राकेश परीट, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, कपिल भोसले, पप्पू कुरिहाळकर, श्रीकांत कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मोर्चामध्ये घुसणाऱ्याला चोप

शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठी भाषिकांच्या फेरीमध्ये काही कन्नड संघटनांच्या सदस्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. गोवावेस येथे मोर्चा सुरू असतानाच गळ्यामध्ये लालपिवळा शेला घालून एक युवक दुचाकी घेऊन घुसला. यामुळे मराठी युवकांनी घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ त्या युवकाला बाजूला केले. याचवेळी उपस्थित असलेल्या उपायुक्त नारायण बरमणी यांनी त्या युवकाला चांगलाच चोप दिला.

दबाव झुगारून जय महाराष्ट्रच्या घोषणा

सीमाभागातील मराठी भाषिक सध्या कर्नाटकात खितपत पडला असला तरी तो मनाने आजही महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कोणताही सण, उत्सव कार्यक्रम असला तर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आवर्जुन लावले जाते. परंतु प्रशासनाकडून या गीतावर वेळोवेळी आक्षेप घेण्यात आला आहे. परंतु रविवारी सायकल फेरीमध्ये सर्वत्र जय महाराष्ट्रच्या घोषणा घुमत होत्या.

Advertisement
Tags :

.