बेकायदा गर्भलिंग निदान टोळीस औषध पुरवठा करणारा एमआर जेरबंद
24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
कोल्हापूर
बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला औषध पुरवणाऱ्या एमआरला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. विजय सुनील पाटील (वय 25 रा. वरणगे पाडळी, ता.करवीर) असे त्याचे नाव आहे. रविवारी सकाळी विजय पाटील याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 24 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर शहातील फुलेवाडी व जुना बुधवार पेठे येथे बेकायदेशिर गर्भलिंग तपासणी व गर्भपात केला जात असल्याची माहिती मिळाल्यनांतर जुना राजवाडा पोलिसांना मिळाली होती. 20 डिसेंबर रोजी पोलिसांनी फुलेवाडी परिसरात छापा टाकून बोगस डॉक्टर दगडू बाबुराव पाटील (वय 45 रा.देवकर पाणंद) याला अटक केली होती. यानंतर सोनोग्राफी करणारा बोगस डॉ. गजेंद्र बापूसो कुसाळे (वय 37 रा. सिरसे,ता.राधानगरी), मदतनीस बजरंग श्रीपती जांभीलकर (वय 31 रा. कसबा ठाणे, ता.पन्हाळा) या दोघांनाही पोलीसांनी अटक केली. सध्या हे तिघेजण पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आपणास गर्भपाताच्या गोळ्या पुरवठा करणारा एमआय विजय सुनील पाटील हा असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पाटील यास अटक केली. या टोळीतील अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.