Paper Leak | औषध निरीक्षक पेपर फुटल्याचा आरोप,पोलिसांत तक्रार करणार ‘एमपीएससी‘चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची माहिती
प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्यावतीने घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (अन्न आणि औषध प्रशासन) संवर्गाच्या भरती प्रक्रियेदरम्यान पेपरफुटीचे आरोप समोर आल्यानंतर आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. याप्रकरणी सर्व संबंधित कागदपत्रे, निवेदने आणि उपलब्ध पुरावे एकत्र करून पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या भरती परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
औषध निरीक्षकाच्या 154 पदांसाठी 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयात ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 12 जून रोजी जाहीर झाला.
त्यानंतर 1 ते 22 जुलैदरम्यान 488 पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि 22 जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या दरम्यान गौरव पाटील नावाच्या व्यक्तीकडून परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार आयोगाला प्राप्त झाली होती.
त्यानुसार तक्रारदार तसेच तक्रारीत उल्लेख असलेल्या संबंधित उमेदवारांना आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, दोघेही चौकशीसाठी गैरहजर राहिल्याचे हरपाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, आयोगाला तक्रारदाराकडून आणखी एक पत्र प्राप्त झाले असून त्यात संबंधित तक्रार ऋषिकेश गांगुर्डे यांनी गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने केली होती. तसेच प्रश्नपत्रिका फुटल्याचा कोणताही दावा आपण करत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या पत्रानंतरही आयोगाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून संबंधित सर्व पुरावे, निवेदने आणि इतर तक्रारींची माहिती एकत्रित करून पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे हरपाळकर यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांचा आरोप
दरम्यान, रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप केला. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत टीईटी, नीट, एसआरपीएफ, तलाठी, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाजनको यासह अनेक भरती परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा करत, पैसे घेऊन आपल्या विचारांचे लोक सरकारी यंत्रणेत पोहोचविण्यासाठी संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला.
औषध निरीक्षकासारख्या महत्त्वाच्या पदावर पैसे देऊन भरती झालेली व्यक्ती नियुक्त झाली तर ती नोकरीत आल्यानंतर प्रथम पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करेल. त्याचा थेट परिणाम औषध प्रशासनाच्या कामकाजावर होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील मूळ प्रश्नपत्रिका आणि परीक्षेपूर्वी प्रसारित करण्यात आलेले प्रश्न यांची तुलना आपण सादर केली असून यासंदर्भात एमपीएससी आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचीही भेट घेणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
व्हॉट्सअॅपवर प्रश्न
औषध निरीक्षक भरतीचा संपूर्ण पेपर फुटला नसला तरी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीकडून दोन दिवस आधी अनेक प्रश्न काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. नंदुरबार येथील एका खासगी अकादमीच्या माध्यमातून हे प्रश्न व्हॉट्सअॅपवर पाठविले जात होते. संबंधित विद्यार्थ्यांपैकी एकाने पुरावा म्हणून हे प्रश्न मित्राला पाठविल्यामुळे हा प्रकार समोर आल्याचे पवार म्हणाले.