For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एमपीएससी गट-क भरतीत मोठी संधी? पदसंख्या 16 हजारांवर नेण्याची समितीची शिफारस; वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत देण्याचाही प्रस्ताव

02:27 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
एमपीएससी गट क भरतीत मोठी संधी  पदसंख्या 16 हजारांवर नेण्याची समितीची शिफारस  वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत देण्याचाही प्रस्ताव
Advertisement
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज केलेल्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या परीक्षेतील पदसंख्या 5 हजारांवरून 16 हजारांहून अधिक करण्याची शिफारस भरती परीक्षा सुधारणांसाठी नियुक्त उच्चस्तरीय समितीने केली आहे. याशिवाय, उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत एकदाच 1 वर्षाची सवलत देण्याचा आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा प्रस्तावही समितीने शासनाकडे सादर केला आहे.
राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह व्हाव्यात, या उद्देशाने 4 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या, सूचना व अभिप्रायांचा अभ्यास समितीने केला. उमेदवारांच्या काही महत्त्वाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज लक्षात घेऊन समितीने अंतरिम अहवाल सादर केला आहे.

गट-क परीक्षेतील पदसंख्या वाढवण्याची शिफारस

एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी सुमारे 12 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सध्या 5 हजारांहून अधिक पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मात्र, विविध विभागांकडून आणखी 11 हजारांपेक्षा अधिक पदांची मागणी आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. ही अतिरिक्त पदे शुद्धिपत्रकाद्वारे भरतीमध्ये समाविष्ट करून एकूण पदसंख्या 16 हजारांहून अधिक करण्याची शिफारस समितीने केली आहे.

Advertisement

वयोमर्यादेत एकदाच 1 वर्षाची सूट

भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मागण्यांचा विचार करून कमाल वयोमर्यादेत विशेष बाब म्हणून एकदाच 1 वर्षाची सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. 1 जानेवारी 2026 नंतर प्रसिद्ध झालेल्या आणि निवड प्रक्रिया सुरू न झालेल्या जाहिरातींसह 31 डिसेंबर 2027 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींना ही सवलत लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

गट-क परीक्षा 2026 मध्ये नव्याने समाविष्ट होणाऱ्या पदांसाठी तसेच वयोमर्यादेतील सवलतीमुळे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी अर्ज प्रक्रिया एकदा पुन्हा सुरू करण्याची सूचना समितीने केली आहे.

Advertisement

परीक्षा सुरक्षेसाठी कडक उपाययोजनांचा प्रस्ताव

परीक्षा प्रक्रियेतील विश्वासार्हता वाढवण्यासाठी समितीने काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या आहेत. गट-क पूर्व परीक्षेची सध्याची परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम कायम ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गांच्या मुख्य परीक्षेचे अभ्यासक्रम लवकर जाहीर करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

खबरदारी म्हणून यापूर्वी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी करण्यात आलेली कार्यवाही रद्द करून नव्या सुरक्षित प्रक्रियेद्वारे प्रश्नपत्रिका तयार करण्याचा प्रस्ताव आहे. प्रश्नपत्रिका आणि ओएमआर उत्तरपत्रिकांच्या छपाईपासून साठवणूक व वाहतुकीपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख, सिग्नल जॅमर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यावरही समितीने भर दिला आहे.

समितीच्या या शिफारशींमुळे एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, पदसंख्या वाढ, वयोमर्यादा सवलत आणि अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय शासनाकडून घेतल्यानंतरच या उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.

Advertisement
Tags :

.