For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

MPSC पेपरफुटी प्रकरणात टॉपर उमेदवारांसह चौघांना अटक; आरोपींची संख्या 11 वर; औषध निरीक्षक परीक्षा गैरप्रकाराचा तपास वेगात

12:07 PM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
mpsc पेपरफुटी प्रकरणात टॉपर उमेदवारांसह चौघांना अटक  आरोपींची संख्या 11 वर  औषध निरीक्षक परीक्षा गैरप्रकाराचा तपास वेगात
Advertisement

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. अंतरिम गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या दोन उमेदवारांसह दोन मध्यस्थांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.

Advertisement

तपासानुसार, अटक करण्यात आलेला उमेदवार साजिद संदे याने लेखी परीक्षेत 152.50 गुण मिळवत अंतरिम गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळवला होता. तर विजय किंगर याने 156 गुणांसह चौथा क्रमांक पटकावला होता. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या ऋतुजा पाटील हिने 155 गुण मिळवत गुणवत्ता यादीत सातवे स्थान मिळवले होते.

गुन्हे शाखेने साजिद संदे याला सांगोला येथून, तर विजय किंगर याला बुलढाणा येथून ताब्यात घेतले. या प्रकरणात मध्यस्थ म्हणून कथित भूमिका बजावल्याप्रकरणी संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांनाही नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली. खलाटे हा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, तर कदम हा भारतीय नौदलात सिव्हिल टेक्निशियन म्हणून कार्यरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Advertisement

154 पदांसाठी झाली होती परीक्षा

MPSC मार्फत अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील 154 पदांसाठी 22 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील सहा परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक फायद्यासाठी प्रश्नपत्रिका अनधिकृतपणे मिळवून तिच्या गोपनीयतेचा आणि परीक्षेच्या निष्पक्षतेचा भंग करण्यात आला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, 2024 आणि भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या रॅकेटमध्ये आणखी काही उमेदवार किंवा संबंधित व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.