सर्बियाच्या संसदेत खासदारांनी फेकले स्मोक ग्रेनेड
दोन खासदार जखमी : एकाची प्रकृती गंभीर : विद्यार्थ्यांच्या निदर्शनांची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ बेलग्रेड
युरोपीय देश सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठा गोंधळ घातला आहे. विरोधी खासदारांनी संसदेत एकामागोमाग एक अनेक स्मोक ग्रेनेड फेकल्याने संसदेत मोठा गोंधळ उडाला. यानंतर संसदेत सत्तारुढ अन् विरोधी खासदारांदरम्यान हाणामारी देखील झाली आहे. सर्बियातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी सरकारच्या धोरणांच्या विरोधात संसदेत स्मोक ग्रेनेड आणि अश्रूधूराचे गोळे फेकले आहेत. यानंतर पूर्ण संसदेत काळा अन् गुलाबी रंगाचा धूर पसरला. सरकारवर नाराज होत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी हे कृत्य केले आहे.
4 महिन्यांपूर्वी सर्बियात रेल्वेस्थानकाचे छत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला हात. यानंतर सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू झाली, जी आता सरकारसाठी सर्वात मोठा धोका ठरली आहेत. संसदेच्या अधिवेशनात सर्बियन डेव्हलपमेंटल पार्टीच्या (एसएनएस)च्या नेतृत्वाखाली सत्तारुढ आघाडीने अधिवेशनाच्या अजेंड्याला मंजुरी दिली यानंतर विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी स्वत:च्या आसनावरून उठत सभागृहाच्या अध्यक्षांच्या दिशेने धाव घेतली, यादरम्यान सुरक्षारक्षकांसोबत त्यांची झटापट झाल्याचे दिसून आले. तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी स्मोक ग्रेनेड फेकले, थेट प्रसारणात संसदेत पसरलेला काळा धूर आणि गुलाबी रंगाचा धूर दिसून आला.
या घटनेत दोन खासदार जखमी झाले असून यातील एसएनएस पार्टीच्या जॅस्मिना ओब्राडोविक यांची प्रकृती गंभीर आहे. संसदेत काम करणे आणि सर्बियाचे रक्षण करणे जारी ठेवणार असल्याचे वक्तव्य सभागृहाच्या अध्यक्ष एना ब्रनाबिक यांनी केले आहे.
सर्बियाच्या संसदेत मंगळवारी देशाच्या विद्यापीठांसाठी निधी वाढविण्याची तरतूद असलेले विधेयक संमत होणार होते. या विधेयकाच्या मागणीवरून तेथील विद्यार्थी डिसेंबरपासून निदर्शने करत आहेत. संसदेत देशाचे पंतप्रधान मिलोस वुसेविक यांच्या राजीनाम्याबद्दलही चर्चा होणार होती, परंतु सत्तारुढ आघाडीने अधिवेशनाच्या अजेंड्यात मांडलेल्या अनेक मुद्द्यांमुळे विरोधी पक्ष संतप्त झाला होता