जस्टीन ट्रूडो यांच्याविरोधात खासदारांची आघाडी
ओटावा : कॅनडाचे नेते जस्टीन ट्रूडो यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी आघाडी उघडली आहे. ट्रूडो यांनी नेतेपदाचा राजीनामा देणे हे प्राप्त परिस्थितीत योग्य ठरेल असे प्रतिपादन करत या खासदारांनी त्यांना नेतपदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. 20 खासदारांनी लेखी स्वरुपात ट्रूडो यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची तयारी दर्शविली आहे. ट्रूडो यांच्यामुळे पक्षाला हानी होत आहे. त्यांची विश्वासार्हता कमी झाली असून आता त्यांनी पद सोडणेच पक्षाच्या भवितव्यासाठी योग्य ठरेल असे या खासदारांनी स्पष्टपणे खडसावले आहे. भारतावर केलेल्या आरोपांमुळे जस्टीन ट्रूडो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कॅनडातील खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या भारत सरकारच्या हस्तकांनी केली असा आरोप त्यांनी जाहीररित्या केला होता. मात्र, आ आरोपाच्या पुष्ट्यार्थ कोणताही ठोस पुरावा नसल्याची कबुलीही त्यांनी दिली होती. या घडामोडींमुळे आणि पुराव्याशिवाय केलेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा ढासळली असल्याचे आता त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आणि लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. कॅनडात पुढच्या वर्षीच्या पूर्वार्धात सार्वत्रिक निवडणूक होत आहे.