‘सतेज’ नेतृत्वामुळेच ‘बिद्री’त मंत्री, खासदार, आमदारांचा पराभव
माजी आमदार के. पी. पाटील : बिद्री कारखाना नुतन संचालक मंडळाकडून आमदार सतेज पाटील यांचा सत्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
बिद्री साखर कारखाना निवडणुकीत एक मंत्री, दोन खासदार, आमदार आमच्या विरोधात उतरले होते. मात्र आमदार सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ या जोडगोळीने त्यांचा टिकाव लागू दिला नाही. सतेज नेतृत्वामुळेच मंत्री, खासदार, आमदार यांचा पराभव करणे शक्य झाल्याचे प्रतिपादन बिद्री कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.
बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यातील विजयानंतर येथील नुतन संचालक मंडळाने गुरुवारी आजिंक्यतारा कार्यालय येथे आमदार सतेज पाटील यांची भेट घेवून कारखाना निवडणुकीत केलेल्या नेतृत्त्वाबद्दल त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार के. पी पाटील म्हणाले, सतेज नेतृत्त्वामुळे कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविण्यास बळ मिळाले. पुढील काळातही आम्हाला तुमचा पाठींबा मिळावा. भविष्यात तुम्ही सांगाल ती राजकीय भुमिका घेऊन, राधानगरी - भुदरगडचा आमदार तुम्ही सांगाल तोच विजयी केला जाईल, असा विश्वास माजी आमदार पाटील यांनी व्यक्त केला. तसेच साखर कारखान्यात शिस्तबद्ध पद्धतीने व्यवहार, पारदर्शक कारभार करून सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे माजी आमदार पाटील यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, बिद्रीच्या निवडणुकीत सर्वांच सहकार्य मिळाल्याने यश मिळाले. हा विजय म्हणजे सभासदांनी माजी आमदार के पी पाटील यांच्या कार्याची दिलेली पोहोच पावतीच आहे. के पी पाटील यांच्या कार्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास असल्यानेच हे यश मिळाले. कोल्हापूर जिह्यात दूध आणि ऊस यांची वार्षिक उलाढाल 12 हजार कोटींची होते. त्यामुळे दूध संस्था आणि ऊस कारखाने या संस्था टिकल्याच पाहिजेत. कारखान्याच्या माध्यमातून शेतकरीभिमुख कारभार होणे गरजेचे आहे. विजयी झालेल्या 25 संचालकांनी एकजुटीन कारखाना प्रगतीपथावर न्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांनी आमदार सतेज पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्ण आणि अर्जुन, अशी भुमिका पार पाडल्याने हा विजय मिळाल्याचे सांगितले. यावेळी राहुल देसाई, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही .बी. पाटील, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले आदी उपस्थित होते.