For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

MP विशाल पाटलांना BJP चे आमंत्रण, कॉंग्रेसला धक्का बसणार की सावरणार?

05:30 PM Apr 24, 2025 IST | Snehal Patil
mp विशाल पाटलांना bjp चे आमंत्रण  कॉंग्रेसला धक्का बसणार की सावरणार
Advertisement

काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण, काँग्रेस प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देणार

Advertisement

By : विनायक जाधव

सांगली : काँग्रेसचे सहयोगी सदस्य असणाऱ्या खासदार विशाल पाटील यांना सातत्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपामध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत. याला दुजोरा देण्याऱ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेंचे वातावरण आहे. काँग्रेसची सध्या अवस्था दयनीय आहे. जे काही कार्यकर्ते राहिले आहेत ते निराशेत आहेत. त्यातच काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्ह्यातील ब्लॉक कमिटीच्या बैठका घेण्यासाठी निरीक्षक रामहरी रूपनवार यांना पाठविले होते. पण या बैठकामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्याविरूध्द सूर आळविला आहे. तसेच आक्रमक कार्यकर्त्यालाच अध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Advertisement

दरम्यान रामहरी रूपनवार यांनी तयार केलेला अहवाल लवकरच प्रदेशाध्यक्षांकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर या निवडी जाहीर होणार आहेत. हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिला होता. पण २०१४ पासून याला सुरूंग लागला. पण त्यावेळेपासून आतापर्यंत जिल्हा काँग्रेस कोणताही धडा घेताना दिसत नाही. सांगली काँग्रेसच्या नेत्यांनी जर एकी दाखबिली तर ते भाजपाला सहज अस्मान दाखवू शकतात. कारण जनतेच्या मनात काँग्रेस आहे. पण या जनतेच्या मनात शिरण्यासाठी जे काम काँग्रेसने काम करण्याची गरज आहे. ते काम नेते करताना आजही दिसत नाहीत.

काँग्रेसमधील नेत्यांची एकमेकांची जिरवा - जिरवीची भाषा आणि एकमेकांना संपविण्यासाठी विरोधकांशी हातमिळवणी करणारी मॅच फिक्सिंग करत आहेत. त्याचा फटका काँग्रेसला बसला आहे. जिल्ह्यात दोन हक्काचे आमदार काँग्रेसने या गटा-तटाच्या राजकारणाने घालविले. माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी काँग्रेसजनांना एक करण्याचा चालविलेला सर्व प्रयत्न या गटा-तटाच्या नेत्यांनी मातीत घालविला. त्यामुळे पुन्हा एकदा सांगलीच्या काँग्रेसचा गटा– तटाने स्वत:चाच गेम केला आहे.

जिल्हा काँग्रेसच्या हातातून काय काय गेले

सांगली जिल्हा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. याठिकाणी लोकसभेला काँग्रेसचाच उमेदवार निवडून येत होता. २०१४ आणि २०१९ साली काँग्रेसची लोकसभेला हार झाली. २०२४ साली काँग्रेसची उमेदवारीच गेली. त्यानंतर याठिकाणी अपक्ष म्हणून विशाल पाटील यांना काँग्रेसने निवडून आणले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, बाजार समिती, महापालिका, नगरपालिका या संस्थावर काँग्रेसचेच वर्चस्व होते. याशिवाय प्रत्येक सहकारी संस्थेत काँग्रेसचे कार्यकर्ते. पदाधिकारी होते. पण आताची स्थिती काय आहे. गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात होती.

सध्या याठिकाणी प्रशासक आहे. अनेक पंचायत समितीत काँग्रेसला दुय्यम नव्हे तर तृतीय स्थानावर रहावे लागले आहे. तर जिल्हा बँकेत जरी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असली तरी याठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. महापालिकेतही महापौर राष्ट्रवादीचा झाला होता. आता याठिकाणी प्रशासक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची दयनीय अवस्था आहे. या काँग्रेसला विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्याप्रमाणात यश मिळण्याची संधी होती पण ही संधी संधी–साधू आणि गटा-तटाने घालविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन हक्काचे आमदार या काँग्रेसजनांनी घालविले आहेत.

माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी केलेल्या एकीच्या प्रयत्नांना सुरूंग लावला

सांगली जिल्ह्यात १९९९ साली जशी काँग्रेस एकसंघ होती. तशी काँग्रेस पुन्हा एकदा बांधणी करण्यासाठी माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी दोन वर्षापासून प्रयत्न सुरू केला होता. त्याला अनेकवेळा यशही आले होते. लोकसभेला तर या प्रयत्नाने यशाचे शिखर गाठले होते. पण त्यानंतर पुन्हा एकदा संधी - साधू असणाऱ्या मंडळींनी काँग्रेसच्या गटाचा गेम केला आहे. सांगली विधानसभेत जर आमदार सुधीर गाडगीळ विरूध्द पृथ्वीराज पाटील अशी एकास एक लढत झाली असती तर पृथ्वीराज पाटील हे ९९ टक्के यशस्वी झाले असते हे आजही जनता सांगते. पण ऐनवेळी श्रीमती जयश्री मदन पाटील यांनी बंड केले आणि हे बंड करून त्यांनी दादा घराण्यावर अन्याय झाला आहे असे सांगत दोन गट पाडले.

खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्यापेक्षा त्यांनी थेट श्रीमती जयश्री पाटील यांच्या पाठीशी राहून कॉंग्रेसबिरोधी काम केले. त्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला. म्हणजेच काँग्रेसने काँग्रेसला खड्डयात घातले. आता त्यामध्ये श्रीमती जयश्रीताई पाटील यांना पक्षातून निलंबित केले आहे. यामुळे काँग्रेसचे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते काँग्रेसपासून बाजूला गेले आहेत. हा फटकाही काँग्रेसला बसू शकतो. याशिवाय खासदार विशाल पाटील यांना भाजपाचे आमंत्रण त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. कारण विशाल पाटील हे अपक्ष खासदार आहेत. ते कोणताही निर्णय सहजपणे घेवू शकतात. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेवर वरचष्मा गाजवणार का पुन्हा विरोधात...

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी सहा ते सात महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, महापालिका या सर्व निवडणुका लागणार आहे. याची तयारी आतापासूनच काँग्रेसने करण्याची गरज आहे. काँग्रेसने यापुढील काळात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी सातत्याने बैठकांचे सत्र घेतले पाहिजे. माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बैठकांचे सत्र लावले तर यामध्ये निश्चितपणे फरक पडू शकतो. गेल्या दहा वर्षात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याकडेही जिल्हा पक्षक्षेष्ठींनी लक्ष दिले पाहिजे. याशिवाय या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवायच्या आहेत का हे पाहिले पाहिजे. मग असे असेल तर कॉंग्रेस महाविकास आघाडीत मोठा भाऊ होणार का हेही पाहणे गरजेचे ठरणार आहे. अन्यथा आतापासूनच स्वबळाचा नारा दिला गेला पाहिजे तरच कार्यकर्ते रिचार्ज होतील त्यामुळे काँग्रेसने आतापासूनच या निवडणुकीची तयारी सुरू केली तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेत वरचष्मा दाखवू शकतात. अन्यथा पुन्हा ते विरोधात असतील.

Advertisement
Tags :

.